बाजारामध्ये गुंतवणूक का करू नये याची अनेक उदाहरणं दिली जातात, परंतु इतिहास हेच सांगतो की दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार्यांसाठी बाजार चांगलाच राहिला आहे. संकटे अनेक आली आणि येत राहतील, पण बाजाराला दीर्घकालीन परताव्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
मागील वर्षभरात लाखो नवीन गुंतवणूकदार जगभरामध्ये नव्हे तर भारतीय शेअरबाजारात उदयास आले व त्यांनी बक्कळ नफादेखील कमावला, परंतु आजही ही संख्या भारतीय लोकसंख्येच्या केवळ दीडच टक्का आहे आणि हीच टक्केवारी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत सर्वांत जास्त असून अमेरिकेत तर ती जवळपास 50 टक्के आहे. मागील 10-12 वर्षांत भारतीय शेअरबाजार 6.85 पटीनं वाढलेला आहे. म्हणजेच जवळपास 17.5 टक्के परतावा प्रतिवर्षी. तरीही भारतात बहुतांश लोकांनी गेल्या 40 वर्षांपासून शेअरबाजारात कधीही गुंतवणूक केली नाही कारण…
1982 – 40 वर्षांत सर्वांत वाईट मंदी, कर्ज संकट.
1983 – बाजार उच्चतम स्तरावर.
1984 – अमेरिकन फेडरल तूट.
1985 – आर्थिक वाढ मंदावली.
1986 – डाऊ 2000 जवळ अमेरिकन बाजार खूप उंच.
1987 – काळा सोमवार-भिती.
1988 – मंदीची भीती.
1989 – जंक बॉन्ड कोसळले.
1990 – आखाती युद्ध, 1 वर्षातली बाजारातील सर्वांत वाईट घसरण.
1991 – मंदी – बाजार खूप उंच.
1992 – निवडणुका, मार्केट फ्लॅट.
1993 – व्यवसायांची पुनर्रचना सुरू आहे.
1994 – व्याजदर वाढत आहेत.
1995 – बाजार खूप जास्त आहे.
1996 – महागाईची भीती.
1997 – असमंजसपणाचा उत्साह.
1998 – आशिया संकट.
1999 – वाय 2 के.
2000 – तंत्रज्ञान सुधार.
2001 – मंदी, जागतिक व्यापार केंद्र हल्ला.
2002 – कॉर्पोरेट लेखा घोटाळे.
2003 – इराकमधील युद्ध.
2004 – अमेरिकेत मोठ्या प्रमाणात व्यापार आणि अर्थसंकल्पातील तूट.
2005 – वाढलेल्या तेल आणि गॅसच्या किंमती..
2006 – हाऊसिंग बबल फुटला.
2007 – सब-प्राइम तारण संकट.
2008 – बँकिंग आणि पत संकटे.
2009 – मंदी – क्रेडिट क्रंच.
2010 – सार्वभौम कर्ज संकट.
2011 – युरोझोन संकट.
2012 – यू.एस. ’फिस्कल क्लिफ’
2013 – फेडरल रिझर्व्ह चालना धोरण कमी करणं.
2014 – तेलाच्या किमती घसरल्या.
2015 – चीनी शेअर बाजारांत घसरण.
2016 – ब्रेक्झिट, अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक.
2017 – शेअर बाजार विक्रमी उंचीवर, बिटकॉइन उन्माद.
2018 – व्यापार युद्धे, वाढणारे व्याज दर.
2019 – भारताचा जीडीपी 5 टक्के.
2020 – सोन्यात तेजी व महामारीचं संकट
2021 – बाजारात अविश्वसनीय तेजी.
अशाप्रकारे काही जण कोणत्याही मंदीच्या युक्तिवादावर अधिक सहमत असतातच व बाजारामध्ये गुंतवणूक का करू नये याची अनेक उदाहरणं देताना आढळतात, परंतु इतिहास हेच सांगतो की दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणार्यांसाठी बाजारचांगलाच राहिला आहे. संकटे अनेक आली आणि येत राहतात, पण बाजाराला दीर्घकालीन परताव्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
यामागील ढोबळ कारणं पहिली तर, शेअरबाजाराकडं पाहण्याचा दृष्टिकोन, शेअरबाजावरील अविश्वास (हर्षद मेहता, केतन पारेख व सत्यम घोटाळा), मूलभूत ज्ञानाचा अभाव, दीर्घावधीच्या योजनांचा अभाव, जोखीम पत्करण्याची तयारी नसणं, इ. बहुतांशी भारतीय गुंतवणूकदार अल्प-मुदतीत झटपट पैसा मिळवण्याच्या उद्देशानेच शेअर बाजारात आणि वाईट अनुभवानंतर बाजारातून कायमचे बाहेर पडतात. भारतीय इक्विटी बाजारामध्ये इतके कमी सक्रिय गुंतवणूकदार का आहेत याचे हेच कारण आहे.
पडत्या बाजारातून संधी शोधण्यासाठी काही क्लुप्त्या
मागील आठवड्यापासून बाजार थोडा थोडा खाली येऊ लागलाय. अनेक जण वरील भावात खरेदी केलेली असल्यानं धास्तावलेले असतील, तर काही जण अजून बाजार पडण्याची वाट पाहत असतील. जे ट्रेडर्स आहेत ते वेळ आल्यास नफा-नुकसानीत आपल्या पोझिशन्स कापतीलच, परंतु काही नवखे ’ट्रेडर्स’ आपला स्टॉप लॉस म्हणजे एखाद्या व्यवहारात म्हणजे घेतलेल्या ट्रेडमध्ये नुकसान सोसण्याच्या तयारीकडं दुर्लक्ष करून परत बाजार वरती आल्यावर त्यामधून बाहेर पडता येईल या आशेवर बसून राहताना आढळतात, परंतु त्यांच्या अपेक्षेनुसार बाजार किंवा त्यांच्या घेतलेल्या शेअर्सचा भाव लवकर न आल्यास, उधारीवर (मार्जिन ट्रेडिंग) त्यांनी घेतलेल्या ट्रेडमधून मोठं नुकसान स्वीकारून बाहेर पडावं लागणं अन्यथा संपूर्ण पोझिशन डिलिव्हरी स्वरूपात घेऊन बसणं हाच पर्याय उरतो. अशामुळं कदाचित संपूर्ण भांडवल अडकून पडतं आणि बाजार खाली येत राहिल्यास नवीन खरेदीच्या संधी आपसूकच मागं पडतात. यासाठी पडत्या बाजारातील पहिला मूलमंत्र म्हणजे, आपल्या योजनेस धरून राहा आणि संधीचं सोनं करा.
दीर्घदृष्टी – बाजार किती पडू शकतो याचा विचार न करता आपण अभ्यासपूर्वक ठरवलेल्या भावात शेअर्स जरूर घ्या आणि विसरून जा.
लक्षात ठेवा – तेजीच्या मार्केटमध्ये कोणीही गुंतवणूक करून पैसे कमवू शकतो, परंतु मंदीच्या बाजारात गुंतवणूक करून नशीब घडवू शकतो.
बाजार खाली येत असताना गुंतवणूकदारांना संधी उपलब्ध होत असतातच, परंतु इकडचं तिकडचं ऐकून आपण आपल्याला काय करायला पाहिजे हे विसरतो आणि झुंड मानसिकतेस बळी पडू शकतो. त्यासाठी करावयांचा थोडा अभ्यास व काही तयारी पुढील भागात.
-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com