अलिबाग : प्रतिनिधी
जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) कार्यक्षेत्रातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 1748 रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी अंदाजित 107 कोटींची गरज आहे.
रायगड जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्हा परिषदेच्या रस्त्यांनाही बसला. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेले अनेक रस्ते वाहून गेले, काही रस्त्यांना भेगा पडल्या. मोर्या, पूल, साकव, संरक्षक भिंती यांनाही अतिवृष्टीचा तडका बसला आहे. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे जवळच्या गावाचा संपर्क तुटला आहे. तर या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यात 112, मुरुड 45, रोहा 130, पेण 132, सुधागड 87, कर्जत 152, खालापूर 109, उरण 31, पनवेल 151, महाड 257, पोलादपूर 112, माणगाव 148, तळा 85, म्हसळा 102, श्रीवर्धन 95 असे एकूण 1748 ग्रामीण रस्त्याचे नुकसान होऊन त्यांची अक्षरश: धूळधाण झाली आहे. या रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी 70 कोटी निधीची आवश्यकता असून तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठविला आहे.
पंधरा दिवसांवर गणपती सण येऊन ठेपला असून, चाकरमानी गावी येण्यास सुरुवात होईल. मात्र जिल्हा परिषदेच्या रस्त्याची वाताहत झाली असल्याने व काही रस्ते वाहतुकीस बंद असल्याने गणेशभक्तांना पर्यायी मार्गाने यावे लागणार आहे. या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.