Breaking News

पाली बायपासला शेतकर्यांचा विरोध

दुबार शेती कायमची उद्ध्वस्त केली जात असल्याचा आरोप

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बायपास मार्गाचा पर्याय उभा केला जात आहे. मात्र पाली, झाप, बुरमाळी येथील शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत नव्याने होऊ घातलेल्या या बायपास मार्गाला कडाडून विरोध केला.

नियोजीत पाली झाप बलाप बायपास मार्ग प्रकल्पातील रस्त्यासाठी 18कोटी तर भूसंपादनासाठी 10कोटींची मंजुरी मिळाली आहे. सदरचा बायपास पाली – पाटनूस राज्यमार्गाला जोडण्यात येणार आहे. या नियोजित बायपास मार्गासाठी करण्यात येणार्‍या भूसंपादनात  दुबार पिकत्या जमिनी जात असल्याने बाधीत होणार्‍या शेतकर्‍यांत संतापाची लाट उसळली आहे.

पाली तहसील कार्यालयात दोन दिवसांपुर्वी या संदर्भात शेतकर्‍यांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी उपस्थित शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत कुठल्याही परिस्थितीत सदर बायपास मार्गाला जमिन देणार नाही, असे सांगितले. या वेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देण्यात आल्या. या बैठकीला सीताराम जाधव, निलेश जाधव, दीपक चव्हाण, रवींद्र वरंडे, दत्तात्रेय गोळे (सर्व रा. झाप), यशवंत काटकर, उमाजी राऊत, जयंत गडगे (सर्व रा. बुरमाळी), बाळकृष्ण काटकर, मंगेश कदम, लक्ष्मण कांबळे, सुजित  काटकर, अनंत लांगी, बाळकृष्ण लखिंमळे, वसंत गडगे, मारुती  ठोंबरे, बाळू काटकर, यशवंत काटकर, सुरेश गायकवाड, अरविंद परब (सर्व रा. पाली) आदी शेतकरी उपस्थित होते.

सदर बायपास मार्गाकरिता पुर्वी शिक्कामोर्तब झालेल्या भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र काही मोजक्या धनिक लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सदर मार्ग वळविण्यात आला आहे, हा डाव आम्ही उधळून लावू, असा इशारा शेतकरी मंगेश कदम यांनी दिला.

आमच्या पुर्वजांनी जपलेली शेतजमीन आम्ही बायपास मार्गासठी देणार नाही, सरकारने शेतकर्‍यांच्या भावनेचा विचार करावा अन्यथा उग्र आंदोलन छेडू, मिलिंद गोळे  या शेतकर्‍याने सांगितले.

येथील शेतकर्‍यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे. आमची शेतीच नष्ट झाली तर आम्ही जगणार कसे? सरकारने आमच्या पोटावर कुर्‍हाड मारू नये, असे रमेश लखीमळे यांनी सांगितले. दरम्यान, या बायपास मार्गाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी या वेळी केला.

नियोजित बायपास जेथून जातो, त्या शेतजमिनीत  पोल उभे केले जात आहेत, ते संबंधीत शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 20) पत्रकारांना दाखविले.

पालीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पाली झाप बलाप यामार्गे बाह्यवळण मार्ग निर्माण होत आहे. त्यासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेसंबंधी ज्या शेतकर्‍यांच्या तक्रारी व अडचणी असतील त्यांनी त्या तहसील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाली कार्यालयाकडे सादर कराव्यात. त्याबाबत संबंधित प्रशासन व शेतकरी यांच्या संयुक्त बैठकीत योग्य तोडगा काढला जाईल.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली सुधागड

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply