महाड : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावरील दासगाव गावाजवळ रविवारी (दि. 7) रात्री सव्वा अकराच्या सुमारास एका ट्रकने टेम्पोला समोरुन ठोकर दिली. या अपघातात टेम्पो चालक ठार झाला तर दोन प्रवाशी जखमी झाले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दासगाव गावाजवळ रविवारी रात्री मुंबईकडे जाणार्या ट्रक (जीजे-19,एक्स-3218) चा चालक संजीव नागोराव भालेराव याने ट्रक विरुद्ध दिशेला नेत समोरून येणार्या टेम्पो (एमएच-06,बीसी-4709) यास समोरासमोर ठोकर दिली. या अपघातामध्ये टेम्पो चालक कैलास गोपाल बंडगर (वय 38, रा. नागाव, हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा गंभीर जखमी होवून ठार झाला. तर विजय धोंडीराम इंगळे (वय 40) आणि ट्रक चालक संजीव भालेराव हे दोघेही जखमी झाले. विजय धोंडीराम इंगळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.