महाड : प्रतिनिधी
जम्मू येथील भारतीय सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये पराक्रम गाजवताना सुरूंग स्फोटात जखमी झालेले महाडमधील जवान सुभेदार कमांडो नरेश पवार यांच्या घरी जाऊन महाड भाजपने बुधवारी (दि. 3) त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि पराक्रमाला सलाम केला. भारतीय सैन्यदलातील 4 मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान एनएसजी कमांडो सुभेदार नरेश रामचंद्र पवार (40, रा. फौजी आंबावडे, ता. महाड) यांनी 23 डिसेंबर 2020 रोजी जम्मू येथील पुंज कृष्णा घाटी येथे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून अतिरेक्यांविरोधात कारवाई करताना भूसुरुंगाचा स्फोट होऊन गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. या मोहिमेत आठ जवान सहभागी होते. या वेळी जवळच असलेल्या गस्त घालणार्या भारतीय सैनिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये बिरवाडी (ता. महाड) गावातील तुकाराम हिरवे हे जवानदेखील सहभागी होते. या जवानांनी सुभेदार नरेश पवार यांना हेलिकॉप्टरने जम्मू येथील सैनिकी दवाखान्यात दाखल केले. बुधवारी त्यांना महाड येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. दरम्यान, भाजपचे महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, तालुका सरचिटणीस महेश शिंदे, निलेश तळवटकर, संकेत उर्फ नाना पोरे, तुषार महाजन, अमित फुटाणकर, अमोद कळमकर, सचिन चांदोरकर आदींनी सुभेदार नरेश पवार यांची भेट घेऊन त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला सलाम करीत त्यांचे कौतुक केले आहे.