Breaking News

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपीस 10 वर्षांचा सश्रम कारावास

अलिबाग : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर  बलात्कार करणार्‍या नराधमाला अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उमेश पांडुरंग कोळी असे आरोपीचे नाव आहे.  

आरोपी उमेश यांची त्या अल्पवयीन मुलीशी हातगाडीवर ओळख झाली होती. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन उमेशने  पेण शहरातील विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे ती गर्भवती झाली. याबाबत  पिडीत मुलीने उमेशला माहिती दिली, तेव्हा त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या गोष्टीची कुठे वाच्यता केली तर पिडीत मुलीच्या संपूर्ण कुटूंबाला संपवण्याची धमकी दिली.

पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भादवी कलम 376 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अर्थात पॉस्को कायद्याच्या विविध कलमांआंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पेण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अलिबाग सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणाची सुनावणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणात शासकीय अभिव्योक्ता म्हणून अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान एकूण पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यात पिडीत मुलगी, तपास अधिकारी उज्ज्वला भडकमकर यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. याशिवाय डिएनए अहवाल महत्वाचा ठरला.

दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयाने शासकीय अभिव्योक्ता अ‍ॅड. बांदिवडेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला आणि अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी उमेश पांडुरंग कोळी याला दोषी ठरवून त्याला दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम पिडीत मुलीला देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply