Breaking News

पनवेलमधील वीजवाहिन्या लवकरच होणार भूमिगत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांची माहिती; महावितरणकडून 151.53 कोटींचा डीपीआर सादर

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल शहरी भागातील वीजपुरवठा करणार्‍या वाहिन्या भूमिगत करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता, तसेच त्या संदर्भात मागणी व पाठपुरावा करून शासनाचे लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने महावितरणकडून 151.53 कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्यात आला असून, हा डीपीआर 1.3 टक्के डीडीएफ योजनेंतर्गत समाविष्ट करून पनवेल महानगरपालिकडे महावितरणचे पनवेल शहर कार्यकारी अभियंता यांनी 23 फेबु्रवारी 2021 रोजी सादर केला आहे, अशी माहिती लेखी उत्तराद्वारे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात, पनवेल शहरी भागातील वीजपुरवठा करणार्‍या वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी ऊर्जामंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचे नमूद करून शहरातील उच्च व लघुदाब वीजवाहिन्या जवळपास 20 ते 25 वर्षे इतक्या जुन्या असल्याने जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी होणारे शॉर्टसर्किट तसेच पक्षी बसून वीजवाहिन्या बंद पडून वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करून पनवेल शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात आहे, अशीही विचारणा या प्रश्नाच्या माध्यमातून शासनाला केली, तसेच या संदर्भात त्यांनी मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या तारांकित प्रश्नावर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, पनवेल शहरास वीजपुरवठा करणार्‍या काही उच्चदाब व लघुदाब वाहिन्या उपरीतार पद्धतीच्या असून, त्या साधारणतः 30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्याने वादळवार्‍यात झाडाच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना पावसाळ्यात घडून येतात. अखंडीत वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने उपरीतार लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर करण्याकरिता महावितरणकडून 151.53 कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्यात आला असून, हा डीपीआर 1.3 टक्के डीडीएफ योजनेंतर्गत समाविष्ट करून महावितरणचे पनवेल येथील कार्यकारी अभियंता यांनी पनवेल महानगरपालिकडे 23 फेबु्रवारी 2021 रोजी सादर केला आहे. दरम्यान, पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर सदैव प्रयत्नशील असतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी पनवेलसह रायगड जिल्हातील विविध विषयांवर राज्य शासनाचे लक्ष वेधून विविध प्रश्न मार्गी लावण्याची मागणीकेली.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply