मुंबई : प्रतिनिधी
देवरत्ननगर चुनाभट्टी येथील देवरत्ननगर रहिवासी महासंघ आणि स्नेहा धार ज्येष्ठ नागरिक संघातर्फे हेल्पेज इंडिया या संस्थेने आयोजित केलेल्या वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार सेवेचा शुभारंभ बुधवारी (दि.10) देवरत्ननगर संकुलातील व्यायामशाळेत करण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष विजय औंधे, मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष शरद डिचोलकर, देवरत्ननगर रहिवासी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ तुपे, सचिव दीपक म्हात्रे, स्नेहाधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गंगाराम पवार आदी उपस्थित होते.
सचिव दीपक म्हात्रे यांनी या वैद्यकीय तपासणी सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, सद्द्याच्या गंभीर परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना आपल्या दारी ही सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.
प्रा. कांबळे यांनी हेल्पेज इंडिया या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ही वैद्यकीय तपासणी व्हॅन दर 15 दिवसांनी आपल्याकडे येईल व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातील असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष विजय औंधे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांचा आढावा घेतला.
या वेळी फेस्कॉनच्या मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष शरद डिचोलकर यांनी फेस्कॉम ही संस्था कशा पध्दतीने काम करते याची माहिती दिली. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व चुनाभट्टीचा इतिहास या पुस्तकाची भेट देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ तुपे यांनी उपस्थितांचे आभार मानले.