Breaking News

देशांतर्गत क्रिकेटला कोरोनाचा फटका

विनू मंकड स्पर्धेबाबत अनिश्चितता; बीसीसीआयचा निर्णय

मुंबई ः प्रतिनिधी
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा फटका देशांतर्गत क्रिकेटला बसला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने सर्व वयोगटामधील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मे-जून महिन्यात होणार्‍या 19 वर्षांखालील वयोगटातील विनू मंकड स्पर्धेचाही समावेश आहे. आयपीएल स्पर्धेनंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर या स्पर्धा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.
विनू मंकड स्पर्धेदरम्यान अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा आहेत. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू या परीक्षा देणार आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ही स्पर्धा खेळवणे योग्य नाही, असे शाह यांनी सांगितले. याबाबत शहा यांनी सर्व क्रिकेट बोर्डांना पत्रदेखील लिहिले आहे. एका वृत्तानुसार सध्याच्या परिस्थितीमध्ये या स्पर्धा झाल्या, तर खेळाडूंना एका शहरामधून दुसर्‍या शहरात प्रवास करावा लागेल. त्याचबरोबर क्वारंटाइन नियमांचे पालन करण्यासाठी बायो बबलमध्ये राहावे लागेल, जे सध्या ठीक नाही.
शाह यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, आमच्यासाठी खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा ही प्राथमिकता आहे. आयपीएल स्पर्धेनंतर या स्पर्धेच्या वेळापत्रकाचा विचार करण्यात येईल. आयपीएल स्पर्धेचा 14वा सीझन 9 एप्रिल ते 30 मेदरम्यान होणार आहे. कोरोना व्हायरसनंतर या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-20 आणि विजय हजारे ट्रॉफी या दोन देशांतर्गत स्पर्धा झाल्या आहेत. या स्पर्धा निवडक शहरांमध्ये पार पडल्या. यासाठी खास बायो बबल तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर इंग्लंड दौर्‍याबरोबरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही सुरुवात झाली आहे.
दरम्यान, भारत-इंग्लंड यांच्यातील चार टेस्ट मॅचची मालिका पार पडली असून सध्या टी-20 मालिका सुरू आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची वन डे टीमदेखील सध्या भारतामध्ये आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या महिला टीममधील वन डे मालिका सध्या लखनऊमध्ये सुरू असून, त्यानंतर टी-20 मालिकादेखील लखनऊमध्ये होणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply