विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुंबईतील हाय प्रोफाइल भागात सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यामुळे राज्य सरकारची मोठी अडचण झाली आहे. या मुद्द्यावरूनच मुंबई पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. या घडामोडीनंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे, असे ते पत्रकारपरिषदेत म्हणाले.
नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत सचिन वाझे यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ’वसुलीच्या रॅकेटमध्ये सचिन वाझे यांचे नाव आले होते, असे असतानाही मी मुख्यमंत्रिपदी असताना सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे हे माझ्यासोबत बोलले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास माझा विरोध होता,’ असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच सचिन वाझेंचा रेकॉर्ड फारसा चांगला नव्हतो, असेही फडणवीस यांनी बोलून दाखवले.
अंबानींच्या अँटिलिया इमारतीसमोर पोलीस अधिकार्याकडूनच स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली जाते आणि त्यात मनसुख हिरण यांची हत्या होते, अशी घटना मुंबईच्या इतिहासात कधीच घडली नाही. रक्षकच भक्षक झाले आहेत, असा घणाघात फडणवीस यांनी केला. 2008 मध्ये सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी वाझे शिवसेनेत प्रवक्ता होते आणि नेत्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंध होते. 2017 मध्ये वाझेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. तरीही गेल्या वर्षी वाझेंना करोनाच्या बहाण्याने पुन्हा पदावर घेतले गेले, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेसोबत सचिन वाझे यांचे अतिशय जवळेचे संबंध होते. एवढंच नाही तर अनेक नेत्यांसोबत त्याचे व्यावसायिक संबंध होते. हे सर्व सचिन वाझे एकटे करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत काही जण आहेत. हे एका पोलीस अधिकार्याचे काम नाही, तर सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मनसुख यांच्या हत्येचा तपाससुद्धा एनआयएने घ्यावा
मनसुख हिरेन यांची हत्या झाली, असे आमचे म्हणणे आहे. या हत्या प्रकरणात एटीएसकडून ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित तशी होताना दिसून येत नाही. एटीएस आणि एनआयए यांच्याकडे अशा काही टेप्स आहेत, ज्यात वाझे आणि मनसुख यांचे संभाषण आहे. मनसुख यांच्या हत्येचा तपास सुद्धा एनआयएने घ्यावा, अशी आमची मागणी आहे. हे पोलिसांचे नाही, तर सरकारचे अपयश आहे. सरकार त्यांचा सभागृहात बचाव करीत होती. ज्या उद्देशाने त्यांना सीआययूमध्ये आणण्यात आले, त्याच्या उद्देशाची सुद्धा चौकशी व्हावी.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पाठराखण
स्फोटके आढळून येणे आणि हत्या होणे हे राज्य सरकाचे अपयश आहे. अधिकार्याची पार्श्वभूमी माहिती असूनही त्यांना पदावर का घेतले. एवढेच नाही तर त्या विभागाचे प्रमुख नेमले गेले. यावरून सरकारच्या भूमिकेवरच संशय निर्माण होतोय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सचिन वाझेंना पाठराखण करताना दिसून आले. सचिन वाझे आणि परबीर सिंग हे तर प्यादे आहेत. त्यांचे राजकीय सूत्रधारांची चौकशी झाली पाहिजे. वाझेंना ऑपरेट करणार्या पॉलिटिकल बॉसेसचा तपास केला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली. मुंबईत बेटिंगचे जे रॅकेट आहे. त्याच्याशीही सचिन वाझेंचा काहीना काही संबंध होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.