उरण : वार्ताहर
तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील चाणजे येथील करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 18 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्थेचे शिरिष सकपाळ यांनी दिली. करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था राज्यातील सर्वात मोठी संस्था आहे. वार्षिक सुमारे 50 ते 51 कोटींची उलाढाल असलेल्या संस्थेचे एकूण 3812 मतदार आहेत. 3812 मतदार 17 संचालकांची गुप्त मतदानाने निवड करणार आहेत. यामध्ये दोन महिला संचालकांचा समावेश आहे. 2015 रोजी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. 2020-21 मध्ये संस्थेची मुदत संपुष्टात आली होती, मात्र कोरोनामुळे दोन वर्ष निवडणूक लांबणीवर पडली होती. आता मात्र मुदत वाढीनंतर येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर तत्काळ त्याच ठिकाणी मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरिष सकपाळ यांनी दिली.