Breaking News

नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर घटला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत तीन पट वाढ होत आता रुग्णांची संख्या 200पर्यंत गेली आहे. रुग्णवाढीचा वेग जास्त असल्याने कोरोनातून बरे होणार्‍यांचे प्रमाणही कमी झाले आहे. दीड महिन्यापूर्वी 96 टक्के असलेला नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर घटत तो 94.86 टक्क्यांवर आला आहे. नवी मुंबई शहरात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले असून सौम्य टाळेबंदी लागू करण्याच्या विचारात पालिका प्रशासन आहे. शहरात आतापर्यंत 57,893 कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी 54,920 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना संसर्ग पसरल्यानंतर जूनमध्ये 57 टक्के इतका कोरोनामुक्तीचा दर होता. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांना शोधून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या व त्यातील संसर्ग असलेल्या रुग्णांना वेळीच वेगळे करून त्यांच्यावर वेळेवर उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्णवाढ होत राहिली, मात्र कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाणही वाढत गेले. त्यामुळे जूनमध्ये 57 टक्क्यांवर असलेल्या कोरोनामुक्तीचा दर हा वाढत जात नोव्हेंबरपर्यंत तो 94 टक्क्यांवर पोहचला होता. त्यात रुग्णसंख्याही कमी झाल्याने शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली होती. दैनंदिन रुग्ण व बरे होणारे रुग्ण ही संख्या एकाच घरात आल्याने अगदी 97 टक्केपर्यंत कोरोनामुक्तीचा दर गेला होता, मात्र 1 फेब्रुवारीनंतर पुन्हा दैनंदिन कोरोना रुग्णांत वाढ सुरू झाली. दैनंदिन रुग्णांची संख्या 50 पर्यंत होती ती वाढत जात 200च्या घरात गेली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. 96 टक्के असलेला कोरोनामुक्तीचा दर हा घटत पुन्हा 94 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे रुग्णवाढीबरोबर हा दर कमी होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नवी मुंबई शहरात कोरोनाचे नवे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दुसरीकडे कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या दिवसाला 100 आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर कमी झाला आहे. आठ ते 10 दिवसांत उपचार घेऊन कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या वाढल्यानंतर कोरोनामुक्तीचा दर वाढेल, परंतु कसेरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

-संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त

विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे माहित असूनही विनाकारण विनामास्क फिरणार्‍यांवर पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे, खांदेश्वर, कळंबोली, खारघर या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अशांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना या विषाणूचा संसर्ग होऊन साथ पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न करता शासनाच्या संचारबंदीचे आदेश असतानाही विनाकारण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्‍या व व्यवसाय करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. शासकीय आदेशाचे उल्लंघन करून हयगयीने व बेदरकारपणे मानवी जीवित व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल, असे कृत्य करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून भांदविस कलम 269, 188 सह आपत्ती व्यवस्थापन आदी कलम 51ब प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे विनामास्क फिरणार्‍या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply