Breaking News

विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा

यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असे राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रक काढून जाहीर केले आहे खरे. पण हा सगळा परीक्षांचा व्याप पार कसा पडणार याबद्दल सर्व स्तरांवर गोंधळाचे वातावरण आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट महाराष्ट्रात सुरू झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत ती उग्र रूप धारण करू शकेल अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ ठरू शकतो याचे भान राज्यकर्त्यांना आहे काय?

सत्तेत राहून फक्त खुर्च्या उबवण्याचा कार्यक्रम पार पाडणार्‍या सत्ताधार्‍यांकडून काही अपेक्षा करणेच अयोग्य ठरते. याचे अचूक प्रत्यंतर सध्या महाराष्ट्रातील जनता घेत आहे. शेतकर्‍यांचा प्रश्न असो वा कायदा-सुव्यवस्थेचा, रोजगाराचा प्रश्न असो वा कोरोनाचा, सर्वच आघाड्यांवर महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. यात आणखी एक वर्ग भरडला गेला आहे, त्याच्याकडे मात्र कोणाचेच फारसे लक्ष नाही. कारण हा वर्ग कुणाचाच मतदार नाही. हा वर्ग आहे विद्यार्थ्यांचा. गेले संपूर्ण वर्ष कोरोना विषाणूच्या साथीने अक्षरश: नासवून टाकले. या प्रचंड मोठ्या आपत्तीमध्ये पार कोसळलेली देशाची अर्थव्यवस्था आता कुठे हळूहळू रूळावर येत आहे. महाराष्ट्रात मात्र त्याही बाबतीत सगळा दुष्काळ आहे. कोरोनाच्या साथीमुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक आणि अन्य हातावर पोट असलेले लोक सार्‍यांनाच आर्थिक चणचणीने ग्रासले. याचा परिणाम अर्थातच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरही झालाच. त्यातच आता शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे त्यांच्या हालास पारावार उरलेला नाही. गेले वर्षभर घरात बसून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणार्‍या लाखो विद्यार्थ्यांना अगणित समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांचा विचार कुणीही केलेला नाही ही दु:खद वस्तुस्थिती आहे. त्यातच सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत गोंधळात आणखी भर पडते आहे ती तथाकथित तज्ज्ञांच्या उलटसुलट सुचनांमुळे. मुख्याध्यापक संघटनेने उत्तीर्ण होण्याची 35 टक्के गुणांची पातळी 25 टक्क्यांवर आणावी अशी सूचना करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. अर्थात यातून परिस्थिती किती बिकट आहे हे अधोरेखित होतेच. गेले वर्षभर विद्यार्थी आपले वर्ष वाचवण्यासाठी धडपड करत होते. पण गेले अनेक दिवस परीक्षांच्या संदर्भात इतकी उलटसुलट चर्चा सुरू आहे की त्यामुळेच विद्यार्थीवर्ग पार गोंधळून जाईल. दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होत असून बारावीच्या परीक्षेला 23 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. या दोन्ही परीक्षांना मिळून लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर गर्दी करणार आहेत. त्याआधी या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही पार पडायच्या आहेत. या परीक्षा पंधरवडाभरावर आलेल्या असताना, कोरोनाशी झुंजायचे की परीक्षेची तयारी करायची? एवढा आटापिटा करून परीक्षा नक्की होईल ना, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना छळत आहेत. परीक्षा केंद्रावर एखाद्या विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाल्याची शंका आल्यास नेमके काय करायचे याच्या स्पष्ट सूचना शाळांना अद्यापतरी मिळालेल्या नाहीत. कोरोनाचा धोका पत्करून इतकी मोठी उठाठेव करण्यापेक्षा चालू वा मागील वर्षाच्या सरासरी गुणांवर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात न्यावे अशी सूचना केली जाते आहे. राज्य सरकारने सर्व सूचनांचा साकल्याने विचार करावा व लवकरात लवकर निर्णय घ्यावा. मुख्य म्हणजे तो माणुसकीला धरून असावा.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply