नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताच्या युवा ब्रिगेडने येथील डॉ. कर्णीसिंग शुटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शानदार कामगिरीच्या बळावर 10 मीटर एअर पिस्तूल व 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदके जिंकली. सौरभ चौधरी-मनू भाकर यांनी एअर पिस्तूलचे आणि इलावेनिल वलारिवान-दिव्यांश पनवर यांनी एअर रायफलचे सुवर्ण जिंकले. भारत पाच सुवर्णपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. सौरभ-मनू यांनी इराणच्या गोलनोश सेबहातोलाही- जावेद फोरोगी यांना 16-12 असे नमविले. दुसर्या फेरीनंतर सौरभ व मनू माघारले होते. त्यांनी पुनरागमन करीत भारताला पाचवे सुवर्णपदक जिंकून दिले. दोघे पात्रता फेरीत 384 गुणांसह दुसर्या स्थानी होते. यशस्विनीसिंग देसवाल व अभिषेक वर्मा यांनी तुर्कस्थानच्या सेवाल इलाहदा तारहान-इस्माईल केलेस यांना 17-13 असे नमवून कांस्यपदक जिंकले. दुसरीकडे गरतोज खांगुरा, मैराज अहमद खान व अंगरवीर सिंग बाजवा यांनी भारतीय संघाला स्कीट प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच, महिलांमध्ये परिनाज धालीवाल, कार्तिक सिंग शक्तावत व गनीमत सेखों यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.