कोलकाता ः वृत्तसंस्था
कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यांनी ट्रेनिंग कॅम्पची तयारी पूर्ण केली आहे. खेळाडू आणि स्टाफ सात दिवसांसाठी क्वारंटाइन झाले आहेत. दोन वेळचा विजेता कोलकाता संघाने क्वारंटाइन कालावधी सुरू होण्याआधी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि फलंदाज राहुल त्रिपाठी यांचे फोटो शेअर केले आहेत. कोलकाताने हे फोटो शेअर करताना त्याला ‘क्वारंटाइन टाइम. या हंगामासाठी खेळाडू तयार आहेत. कॅम्पची सुरुवात होणार आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला 9 एप्रिलपासून प्रारंभहोणार आहे. या हंगामात कोलकाताचा पहिला सामना 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. उभय संघांतील हा सामना चेन्नईत खेळला जाईल. मागील हंगामात कार्तिकने स्पर्धेच्या मध्यातंरानंतर अचानक कर्णधारपद सोडले होते. तेव्हा संघ व्यवस्थापनाने इयॉन मॉर्गनकडे कर्णधारपद सोपविले. या हंगामात मॉर्गनच कोलकाताचे कर्णधारपद भूषवणार आहे.