नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने ‘प्ले-ऑफ’च्या गटात दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्लीने बंगळुरुवर 16 धावांनी मात केली. बंगळुरुच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना टक्कर दिली, मात्र मोक्याच्या क्षणी दिल्लीने भेदक गोलंदाजी करून बाजी मारली. बंगळुरु संघ 171 धावांपर्यंत मजल मारू शकला.
विराट कोहली-पार्थिव पटेल जोडीने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या विकेटसाठी 63 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवत दिल्लीवर दबाव आणला, मात्र रबाडाने पटेलला माघारी धाडले. यानंतर ठराविक अंतराने विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, शिवम दुबे, हेन्रिच क्लासेन हे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या षटकात गुरकिरत मान आणि मार्कस स्टॉयनीस जोडीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. दिल्लीकडून अमित मिश्रा आणि कगिसो रबाडाने दोन; तर इशांत शर्मा, अक्षर पटेल, शेरफन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी एक गडी बाद घेतला.
त्याआधी, शिखर धवन-कर्णधार श्रेयस अय्यरचे अर्धशतक आणि तळातल्या फळीत शेरफन रुदरफोर्ड आणि अक्षर पटेलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने 187 धावांपर्यंत मजल मारली. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने दोन; तर उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने प्रत्येकी एक गडी बाद केला.