हैदराबाद ः वृत्तसंस्था
आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादमधून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने यंदा माघार घेतली आहे. त्याच्याजागी इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला हैदराबादने ताफ्यात घेतले आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा लिलाव चेन्नईत झाला. त्या वेळी लिलावात जेसन रॉयवर कोणत्याच संघाने लावली नव्हती. एकाही संघाने खरेदी न केल्यामुळे रॉय निराश झाला होता. नंतर त्याने सोशल मीडियावर यंदा आयपीएलचा भाग नसणे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती, पण आता मिशेल मार्शने माघार घेतल्यामुळे दोन कोटी रुपये या बेस प्राइसमध्ये हैदराबादने रॉयला आपल्या संघात घेतले आहे. रॉयने 2017मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत आयपीएलमध्ये तो गुजरात लायन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलाय. आयपीएलच्या आठ सामन्यांमध्ये रॉयच्या नावावर 133.58च्या स्ट्राइक रेटने केवळ 179 धावा आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे, परंतु नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत रॉयने दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या शानदार फॉर्मचा फायदा सनरायझर्स हैदराबादला होऊ शकतो.