पेण : प्रतिनिधी
महावितरणने थकीत वीज देयकांची वसुलीसाठी पेण तालुक्यात मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पेण तालुक्यात 58 हजार 220 वीज ग्राहक असून त्यातील 19 हजार 195 जणांनी गेल्या सहा महिन्यांतील वीज देयके वेळेवर भरलेली नाहीत. या ग्राहकांकडून महावितरणने आतापर्यंत 10 कोटी 32 लाख 11 हजार 171 रुपयांची वसुली केली आहे. अद्याप आठ कोटी दोन लाख 44 हजार 892 रुपयांची वसुली शिल्लक आहे.
कोरोना काळात पेण तालुक्यातील एक हजार 142 घरगुती ग्राहक आणि 381 व्यापारी ग्राहकांनी वीज देयकांची रक्कम न भरल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची महिती महावितरण अधिकार्यांनी दिली.
वीज देयकांची थकबाकी वसुली करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार पेण महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता के. सी. भिसे, कनिष्ठ अभियंता उमाकांत सपकाळे, सहाय्यक अभियंता बी. बी. जाधव, एस. ए. उमप आदी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.