Breaking News

कर्जत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

सर्वाधिक 74 रुग्णांची नोंद; माथेरान ठरतेय हॉटस्पॉट

कर्जत : बातमीदार

तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू लागला आहे. रविवारी (दि. 4) कर्जत तालुक्यात 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, शनिवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात घाबराट पसरली आहे.

मागील महिन्यापासून कर्जत तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यात  एकाच कुटुंबात बाधीत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्जत तालुक्यात गतवर्षीत एका दिवसात सर्वाधिक 49 रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ही कर्जत तालुक्यामधील एका दिवसातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कर्जत शहर आणि माथेरान ही दोन शहरे आणि ग्रामीण भागातील कशेळे आणि शिलार ही गावे मागील दोन दिवसात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहेत. एकट्या माथेरानमध्ये तब्बल 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात संत रोहिदासनगरमध्ये कोरोना रुग्णांची साखळी दिसून येत आहे. कर्जत शहरात रविवारी तब्बल 23 रुग्ण आढळले. त्यात संजयनगर, कोतवालनगर, विठ्ठलनगर, साईनगर, समर्थनगर, धापया मंदिर परिसर, सुयोगनगर, महावीर पेठ, भिसेगाव, दहिवली, मुद्रे आणि नाना मास्तरनगर भागातील रुग्णांचा समावेश आहे. वन विभागातील दोन कर्मचार्‍यांनाही कोरोना झाला आहे.

कर्जत तालुक्यातील कशेळे, शिलार, नेरळ, कडाव, पोखरकरवाडी, कोल्हारे, बोपेले, वंजारपाडा, माणगाव, भिवपुरी, कोठिंबे, वेणगाव, अंजप या गावांतदेखील कोरोना सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. कशेळे गावात रविवारी 10कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

दरम्यान, नेरळ आणि कोठिंबे येथील प्रत्येकी एका तरुणाचा शनिवारी कोरोनामुळे बळी गेला आहे.

माणगावमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून 16,500 रुपये दंडाची वसुली

माणगाव : प्रतिनिधी

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिक व दुकानदारांवर माणगाव नगरपंचायत व पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करून 16 हजार 500 रुपयांची दंड वसुली केली.

माणगाव तालुक्यात कोविडचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत, ते लक्षात घेवून कोरनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहन माणगाव नगरपंचायत व पोलीस वेळोवेळी करीत आहेत. तरीही येथील बाजारपेठेत कोरनाविषयक नियमांचे राजरोस उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. 31 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत बाजारपेठेत विनामास्क फिरणार्‍या तसेच सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) न ठेवणार्‍या नागरिक व दुकानदारांवर माणगाव नगरपंचायत व पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करून 16हजार 500 रुपयांची दंड वसुली केली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे.

-प्रशाली जाधव दिघावकर, उपविभागीय अधिकारी, माणगाव

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply