पेणमध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरले
पेण : प्रतिनिधी
मुसळधार पावसाने पेण तालुक्यात धुमाकूळ घातला असून, नदी व खाडीकिनारी असलेल्या ग्रामस्थांची झोप उडाली आहे. तालुक्यातील गावा गावात नदीचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने रविवारी रौद्र रूप धारण केल्याने पेण तालुक्यातील बाळगंगा नदी तुडूंब भरून वाहू लागली. त्यामुळे ग्रामीण भागात घरांमध्ये, शेतीमध्ये खाडीचे, नदीचे पाणी शिरले आहे. दुरशेत, खरोशी, तांबडशेत, जोहे, दादरबेडी, वाशी विभागातील शेतीचे व शेततलावांचेही नुकसान झाले आहे. रात्रीच्या अतिवृष्टीमुळे संतोष पाटील यांच्या मालकीचा अर्धा एकराचा तलाव फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाला आहे. एक महिन्या पूर्वीच या तलावामध्ये मत्स्य बीज सोडले होते. रात्री झालेल्या अतिवृष्टीमध्ये तलावाच्या दोन्ही भिंती पडून मत्स्यबीज वाहून गेले आहे. दुरशेत येथे दरड पडून चार घराचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुंबई-गोवा महार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पेणजवळ तर रस्त्याची चाळण झाली आहे. वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावर बाळगंगा नदीचे पाणी आले असून चुनाभट्टी जवळील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पेण शहरातील उत्कर्षनगर येथील सखल भागात पाणी साचले आहे. भुंडापुलावरून भोगावती नदीचे पाणी वाहू लागल्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस कधी एकदा विसावा घेतो याची नागरिक वाट पाहत आहेत.
काळ नदीने ओलांडली धोक्याची पातळी; दरड कोसळल्याने दिघी-माणगाव रस्त्यावरील वाहतूक बंद
माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात रविवारी दिवसरात्र मुसळधार पावसाने थैमान घातले होते. सोमवारीही (दि.19) पावसाचा जोर कायम होता. माणगाव शहरातील काळनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मोर्बा घाटात नाईटणे गावच्या हद्दीत दरड कोसळल्याने माणगाव-दिघी रस्त्यावर मातीचा थर आला. त्यामुळे श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगरकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. जेसीबी, पोकलण लावून माती हटविण्यात येत आहे. माणगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी तर पावसाने कहरच केला. दिवसरात्र पाऊस पडत होता. सोमवारी सकाळी पावसाचा जोर कायम होता. सकाळी मोर्बा घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घेतली. त्यांनी माणगाव येथून साई, म्हसळा, श्रीवर्धन, दिवेआगरकडे जाणारा मार्ग वाहतूकीसाठी बंद केला आला आणि जेसीबी, पोकलण वापरून माणगाव – दिघी रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.