पनवेल : वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने बहुतांश रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासत आहे. कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज ओळखून खारघरमधील गुरुद्वारातर्फे मिनी आणि मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात आले आहेत.
ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णाचा कोरोना अहवाल सादर केल्यास गुरुद्वाराकडून विनामूल्य मिनी आणि मोठा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिला जात आहे. खारघरमधील गुरुद्वारातर्फे दोन दिवसांत 25 मिनी ऑक्सिजन सिलिंडर, तर दोन मोठे ऑक्सिजन सिलिंडर विनामूल्य वाटप करण्यात आले.
दरम्यान, मिनी ऑक्सिजन सिलिंडरची गरज असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी खारघरमधील सेंट्रल पार्क शेजारी असलेल्या गुरुद्वारामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन खारघर गुरुद्वारा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.