पनवेल : रामप्रहर वृत्त
रेमेडेसिवीरचा काळा बाजाराने विक्री करणार्या कळंबोलीतील काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचे दुप्पट, तिप्पट दरात काळा बाजारात विक्री केली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरत असल्यामुळे त्याची प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्याचाच फायदा घेऊन काही समाजकंटक रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी खारघरमधील लिट्ल वर्ल्ड मॉल समोरील रस्त्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळताच सापळा रचून दोन रेमडेसीवर इंजेक्शन घेवून आलेल्या हरपिंदर सिंग (41, रा. कळंबोली) यास अटक केली असून त्याच्याकडून जवळपास पाच लाख 18 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
हरपिंदर सिंगला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यांच्या समवेत अजून कोण कोण या रेमडेसिवीरचा काळाबाजार करण्यात सहभागी आहे, तसेच रेमडेसिवीर कोठून आणले याबाबत गुन्हे शाखा कसून तपास करीत आहे.
महाआघाडीतील बड्या नेत्यांसोबत त्याचे फोटो सोशल मिडीयावर आहेत, त्यामुळे बारामतीप्रमाणे पनवेल परिसरातील या प्रकाराने चर्चेला उधाण आणले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper