नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात 16 जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसर्या टप्प्याला 1 मेपासून सुरुवात होत आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया गुरुवार (दि. 28) पासून सुरू झाली असून लसीकरण नोंदणी प्रक्रियेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. पहिल्या एका तासात कोविन अॅपवर 18 वर्षे वयावरील 35 लाख लोकांनी लसीसाठी नोंदणी केली आहे. मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्याने सुरुवातीला तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले. या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाइल नंबरवर पाठवला जातो, मात्र हा ओटीपी येत नसल्याचे समोर आले आहे. नोंदणी प्रक्रिया चार वाजेपासून कोविन अॅपवर सुरू झाली. मात्र एकदम मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी नोंदणी सुरू केल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले गेले. आरोग्य सेतू तसेच कोविन अॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अॅपवरच नोंदणी करणार्यांना रिडायरेक्ट केले जात असल्याने कोट्यवधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाले असल्याची माहिती आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती की, तिसर्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होईल. नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर होईल. 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण 1 मे पासून सुरू होणार आहे. कोविड 19 लस नोंदणीसाठी कोविन (CoWIN) पोर्टल देखील अधिक कार्यक्षम करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली होती. दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहे. यासोबतच दररोज 50 लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते. आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते.
अशी आहे नोंदणी प्रक्रिया :
http://cowin.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. इथे तुमचा वैध मोबाइल क्रमांक टाईप करा. पुढं Get OTP या बटणावर क्लिक करा. एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल. ओटीपी तिथे दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन Verify या बटणावर क्लिक करा. ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही registration of Vaccination अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहचाल. इथे आवश्यक ती माहिती द्या. माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपर्यावर Register या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल. Account details page वर असणार्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा Schedule Appointment वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल. Book Appointment for Vaccination page असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची व वेळेची निवड करत लसीकरणासाठीचे हे पुढचे पाऊल टाकणे शक्य होईल.