पनवेल : वार्ताहर
दोन ट्रकच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील एक्सप्रेस महामार्गावर शनिवारी (दि. 8) पहाटे 4 वाजता घडली.
एक्सप्रेस महामार्गावर वर पुणे ते मुंबई लेन किलोमीटर 09.600 जवळ मोटार ट्रक (केए-22-सी-3253) वरील ट्रकचालक सत्यम अशोक घोडके (वय 22, रा. मु. पो. कुदावाडी ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हा तळोजाकडे जाण्यासाठी त्याचा ट्रक घेऊन जात होता. या वेळी एक्सप्रेस महामार्गावरील पनवेल एक्झिट येथून बाहेर पडावे की सरळ जावे या गोंधळामध्ये एक्झिटच्या पुढे उभा असलेला अशोक लेलन्ड कंपनीचा ट्रक यास त्याने पाठीमागून जोरात धडक देऊन अपघात केला. अशोक लेलन्ड कंपनीच्या ट्रकचा चालक हा तिथे न थांबता निघून गेला. या अपघातामध्ये अपघाती ट्रकच्या डाव्या बाजूला बसलेला क्लिनर बंडू तुकाराम गुरुनाथ साळगे (वय 32, रा. मु. पो. कुदावाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यास गंभीर दुखापती होऊन तो दबला. त्यास देवदूत टीमने कटरच्या सहाय्याने व आय आर बी हायड्राच्या मदतीने ट्रकमधून बाहेर काढून उपचारार्थ पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असता तेथे तो मृत्यू पावला आहे.
आयआरबी कंपनीच्या पथकाच्या मदतीने अपघात ग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करून रस्ता साफ करण्यात आला व वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. घटनास्थळी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर, नवीन पनवेल वाहतूक शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक ढाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे व आणि अग्निशामक दल हजर होते.