वैश्विक महामारी कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे भारतात हाहाकार उडाला आहे. देशातील रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत चालले असून, आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. दुसरीकडे या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार एकाच वेळी अनेक पातळ्यांवर समर्थपणे काम करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
दोन वर्षे झाली तरी कोरोना नामक दृष्टचक्र थांबण्याचे नाव घेत नाहीए. चीनच्या वुहानमधून उत्पत्ती झालेल्या कोविड-19 विषाणूने जगात अक्षरश: होत्याचे नव्हते केले. आताही काही देशांत त्याचा प्रादुर्भाव कायम आहे. नाही म्हणायला यंदा वर्षारंभी आपल्या देशात कोविड-19च्या संसर्गात प्रचंड घट आली होती, पण पहिल्या तिमाहीनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि हा हा म्हणता फैलाव वाढला. आता तर दररोज सरासरी चार लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत, तसेच मृत्यूचे प्रमाणही प्रतिदिन तीन-चार हजारांमध्ये आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणार्यांची संख्या लक्षणीय आहे. दैनंदिन हजारो रुग्ण कोरोनावर यशस्वीपणे मात करीत आहेत. त्याचवेळी लसीकरण, औषधे यांच्यात भर पडत आहे. याआधी आपल्याकडे सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोनच लसी उपलब्ध होत्या. आता रशियाने तयार केलेली आणि जगभरात सर्वाधिक प्रभावशाली मानली जाणारी स्पुटनिक व्ही या लसीचे डोसही आपल्या देशात दाखल झाले आहेत. याशिवाय झायडस कॅडिला कंपनीच्या विराफिन औषधाच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हे औषध 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या व सौम्य लक्षणे असणार्यांसाठी परिणामकारक असल्याचे म्हटले जात आहे. विराफिनपाठोपाठ 2-डीजी हे आणखी एक कोरोना प्रतिबंधक औषध उपलब्ध होत आहे. पावडरच्या स्वरूपातील हे औषध पाण्यात मिसळून रुग्णाला दिले जाते. यामुळे ते संक्रमित पेशींमध्ये जाऊन विषाणूला रोखण्यास मदत होते. सोबतच रुग्णांची ऑक्सिजनची गरज या औषधामुळे बर्याच प्रमाणात कमी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन यांचेही उत्पादन वाढू लागले आहे. एकूणच वेगवेगळ्या पद्धतीने कोरोना रुग्णांना दिलासा देऊन हा संसर्ग कसा आटोक्यात येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पावले उचलत आहेत. त्याचप्रमाणे राज्यांना वेळोवेळी सूचना, मार्गदर्शन करीत आहेत. पंतप्रधान मोदी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करून त्या त्या ठिकाणच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत, तर दुसरीकडे जागतिक पातळीवर अनेक देशांच्या प्रमुखांशी संपर्क साधून त्यांच्याकडून भारताला काय मदत मिळेल यासाठीही प्रयत्नशील आहेत. त्यानुसार अनेक देशांकडून भारताला वैद्यकीय उपकरणे, औषधे उपलब्धदेखील झाली आहेत. येत्या काळात कोरोनाची तिसरी, चौथी लाट येऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ते पाहता काळजी अधिक घेणे अनिवार्य आहे. शासन-प्रशासन आपल्या परीने आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत. त्यास नागरिकांनीही साथ देणे गरजेचे आहे. कोणतीही मोहीम यशस्वी करायची असेल तर त्यात जनतेचे योगदान आवश्यक असते. एकत्रित प्रयत्नांनी यापूर्वी आपण एकदा कोरोनाला थोपवलेले आहे. आता पुन्हा एकदा बिकट परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी नियमांचे पालन करून एक एक पाऊल पुढे टाकायचे आहे.