लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या सभांना कुणी प्रायोजित केले आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतोय. आता आयोगानेही त्याची योग्य ती दखल घेऊन भाजपने जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यांचे योग्य प्रकारे निराकरण करणे गरजेचे बनले आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता काही प्रादेशिक पक्ष सत्ताधारी भाजपच्या विरोधात प्रचार करू लागले आहेत. अर्थात लोकशाहीत कुणाही व्यक्तीला, राजकीय पक्षाला असा प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार भारतीय राज्य घटनेने दिला आहे, मात्र आपला उमेदवारच उभा नसताना मनसे, शेकापसारखे प्रादेशिक पक्ष अस्तित्व टिकविण्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पाहून आश्चर्य वाटायला लागते.शेकाप हा निदान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे ते काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रचार करीत सुटले आहेत, मात्र मनसेचे अजून काही गौडबंगाल सुटलेले नाही. मनसेचे राज ठाकरे हे राज्यभरात भाजपविरोधात प्रचारात उतरले आहेत.राज ठाकरे यांच्या भाषणाचा सारा रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरच राहिलेला आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसारखा नेता पंतप्रधान होणे देशासाठी किती भूषणावह आहे हे राज ठाकरे पदोपदी पटवून देत होते, मात्र त्यानंतर मात्र भाजपने राज ठाकरे यांना योग्य ते महत्त्व न दिल्यानेच सध्या राजसाहेब कमालीचे बिथरलेे आहेत. त्याचा राग काढण्यासाठीच ते काँग्रेस, राष्ट्रवादीची सुपारी घेऊन गावोगावी प्रचार करण्यासाठी फिरू लागले आहेत. त्यांच्या या सभांना प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभत असला तरी त्याचे मतांत किती रूपांतर होते हे निवडणूक निकालानंतरच दिसून येणार आहे. त्यांच्या या सभांवर होणार्या लाखो रुपयांच्या खर्चाचा हिशेब सादर केला जावा, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजप नेते तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. या सभांमधून राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या उमेदवारांना निवडून द्या. शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार करीत आहेत. हा प्रचार प्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा होत आहे, असेही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणले आहे. तावडे यांचा मुद्दा रास्त आहे. कारण निवडणूक काळात सभा घ्यायची झाल्यास त्याचा खर्च आयोगाला सादर करावा लागतो. राज ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसले तरी ते काँग्रेस, राष्ट्रवादीचा अप्रत्यक्षपणे प्रचारच करीत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या जाहीर सभांचा खर्च हा राज ठाकरे यांनी ज्या ज्या मतदारसंघांत सभा घेऊन काँग्रेसला मतदान करा, राहुल गांधी हे पंतप्रधान झाले तर चालतील असे जाहीर केले आहे, त्या
मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करणे गरजेचे आहे. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च संबंधित उमेदवारांच्या ख़र्चात समाविष्ट झाला, तर आपोआपच दोन्ही काँग्रेसवाल्यांचे डोळे उघडतील व असे भाडोत्री नेते प्रचारात घेतल्याचा पश्चातापही झाल्याशिवाय राहणार नाही. आयोगाने याबाबत कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे.