पनवेल ः प्रतिनिधी
खुटारी या जिल्हा परिषदेच्या शाळेत सीएसआर फंडातून गॅलेक्सी कंपनीने केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापान समितीचे माजी अध्यक्ष विलास म्हात्रे यांनी रायगड जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. पनवेल तालुक्यातील खुटारी या जिल्हा परिषदेच्या शाळेत सीएसआर फंडातून गॅलेक्सी कंपनीने 25 लाख रुपयांची दुरुस्तीची कामे करून द्यायचे ठरले होते. त्यामध्ये शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती आणि इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार होती. तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास म्हात्रे यांना या वेळी कंपनीच्या अधिकार्यांनी 25 लाख रुपयांच्या धनादेशावर सही करण्यास सांगितले. त्यांनी ही कामे व्यवस्थित नसल्याचे दिसून आल्याने सही करण्यास नकार दिला. त्यानंतर 14 लाख 65 हजार रुपयांची कामे झाली असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात तेवढीही कामे नसल्याचे विलास म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यांनी धनादेशावर सही न केल्याने त्यांच्यावर दडपण आणण्यात आल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. सीएसआर फंडातून कामे केल्यास कंपनीला आयकरात सवलत मिळते म्हणून कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार या भागातील शाळांच्या दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक करीत असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी विलास म्हात्रे यांनी रायगड जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.