नांदूरवैद्य ः प्रतिनिधी
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे (दुमाला) फाट्यावर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलपंपाजवळ स्विफ्ट गाडीच्या झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11.45 वाजेदरम्यान घडली. नाशिकहून मुंबईकडे जात असताना स्विफ्ट गाडी क्र. (एमएम 01 बीजी 1561) या गाडी चालकाचा समोर गतिरोधक असल्यामुळे ब्रेक दाबण्याच्या स्थितीत ताबा सुटल्याने समोरच मुंबईकडे जात असलेल्या ट्रकला (एमएच 04 एफव्ही 8854) मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात राणीसाहेब पाटील (45), विजया पाटील (32), प्रीती पाटील (13), राजेश अदित्यप्रसाद पांडे (30, सर्व राहणार मुंबई) हे चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोंदे फाटा येथील जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोंदे फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे मुंबईकडे जाणार्या गाड्या टोलरस्त्याने जातात. त्यामुळे दोन-तीन दिवसांपासून या ठिकाणी वाहनांची गर्दी होत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. बाजूलाच भाजी बाजार असल्यामुळे सायंकाळी येथे नागरिकांचीदेखील खरेदीसाठी गर्दी होत आहे.