Breaking News

कोविडबाधितांसाठी फिरते वाचनालय

सहजसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

खालापूर ः प्रतिनिधी

कोरोनामुळे मिळालेल्या निवांत वेळेचा उत्तम उपयोग व्हावा या विचारातून सातत्यपूर्ण सामाजिक चळवळ राबविणार्‍या सहजसेवा फाऊंडेशनमार्फत कोरोना रुग्ण ताणतणावापासून मुक्त रहावेत व त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी फिरते वाचनालय उपक्रम राबविण्यात आला. या वाचनालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 23) खोपोलीतून करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वाचनालयात हलकी फुलकी मनोरंजनात्मक पुस्तके, प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारी पुस्तके, कथा, कादंबरी, धार्मिक ग्रंथ यांचा समावेश आहे.

कर्जत व खालापूर तालुक्यातील फिरत्या वाचनालयाच्या उपक्रमातून वाचनाचा संसर्ग वाढण्यासाठीसुद्धा मदत होऊ शकते. पुस्तके वाचून झाल्यावर ती योग्य रीतीने सॅनिटाइझ केली जातील.

हाजी अश्रफ शहाबुद्दीन खान फाऊंडेशन, कर्जत यांच्यामार्फत उपलब्ध करून दिलेल्या सहज रेस्क्यू व्हॅनमधून ही पुस्तके कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून हॉस्पिटलमधील रुग्णांना निःशुल्क काही दिवसांसाठी परत देणे तत्त्वावर पोहचवली जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्र सेवा तालुका वाचनालय, खालापूर व निलेश बाणखेले यांचे विशेष सहकार्य लाभले. रायगडभूषण हभप रामदास पाटील महाराज व सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहजसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, उपाध्यक्ष इशिका शेलार, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, कार्यवाह बी. निरंजन, योगिता जांभळे, मंगेश सुखधरे, बंटी कांबळे, परेश ठोंबरे, साजगाव जिल्हा परिषद प्रमुख सुरज पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

सोशल मीडियाच्या काळात लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जोपासून वाचनप्रेम वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत, असे हभप रामदास महाराज पाटील यांनी सांगितले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply