Breaking News

विविध मागण्यांसाठी महावितरणचे अभियंते 6 सप्टेंबरपासून संपावर

स्टाफ सेटअप धोरणामुळे बेरोजगारीची भीती

पेण : प्रतिनिधी

महावितरणच्या वीज निर्मिती, पारेषण व वितरण या विभागात काम करणार्‍या अभियंत्यांच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत उदासीन असलेल्या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी या तिन्ही विभागातील अभियंते 6 सप्टेंबरपासून संपावर जाणार असल्याची माहिती सब ऑड्रीनेट संघटनेचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी संजय ठाकूर यांनी दिली.

महावितरणच्या निर्मिती, पारेषण व वितरण या तिन्ही विभागातील अभियंते कोविड काळासह नैसर्गिक आपत्तीमध्येदेखील जोखीम घेऊन आपले कर्तव्य बजावत  आहेत महापारेषण विभागाच्या प्रशासनातर्फे 15 जून 2021 पासून स्टाफ सेटअप लागू करून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  त्यामुळे 507 उपकार्यकारी अभियंता व 140 अतिरिक्त कार्यकारी अभियंते यांची पदे कमी होणार आहेत तसेच भविष्यामध्ये त्यांच्या पदोन्नतीमध्ये गंभीर परिणाम होणार असल्यामुळे या स्टाफ सेटअप विषयी अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे संजय ठाकूर यांनी सांगितले.

महावितरणमधील आवश्यक रिक्त पदे ही संकल्पना मागील वर्षापासून बदली धोरणामध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला प्रखर विरोध करत संघटनेच्या प्रतिनिधींनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली होती. त्या वेळी ऊर्जामंत्र्यांनी सदर धोरण पुढील वर्षी लागू न करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र याच वर्षापासून हे धोरण राबविण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. त्याचा ग्राहक सेवेवर परिणाम होऊन कंपनीची प्रतिमा मलीन होऊ शकते. या निर्णयामुळे राज्यातील अभियंत्यांच्या विनंती बदल्यासुद्धा रखडणार आहेत. त्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी असल्याचे संजय ठाकूर यांनी सांगितले.

महावितरणच्या पारेषण विभागामध्ये 2015 पासून तर वितरण व निर्मिती विभागामध्ये दोन वर्षापासून पदोन्नती झालेली नाही. निर्मिती विभागामधील एकतर्फी बदली धोरण व फॅक्टरी भत्ता लागू न करणे, संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनातर्फे नवीन भरती धोरण व सेवा विनियम एकतर्फी लागू करणे, वीजबील वसुलीबाबत प्रशासनाकडून कर्मचार्‍यांवर होत असलेला दबाव व त्यामुळे कर्मचार्‍यांना मारहाण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कर्मचार्‍यांना लोकसेवक दर्जा मिळावा अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष केले असल्याने 6 सप्टेंबरपासून या तिन्ही विभागातील अभियंते संपावर जाणार आहेत.

-संजय ठाकूर, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य सब ऑड्रीनेट संघटना

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply