कर्जत : बातमीदार
तौक्ते चक्रीवादळाने माथेरानला 24 तास वेठीस धरले होते. या वादळात भलेमोठे झाड कोसळून येथील मोहम्मद शेख यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. लॉकडाऊनमध्ये कोणताही व्यवसाय नसल्याने शासनाने बेघर झालेल्या शेख कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे.
माथेरानमध्ये नूर विला हा अबीद नुकमंदी यांच्या मालकीचा बंगला असून, तेथे मोहम्मद शेख हे माळी म्हणून कामाला आहेत. 16 मे रोजी झालेल्या चक्रीवादळात त्यांच्या घरावर भलेमोठे झाड कोसळून घर भुईसपाट झाले. नगरपालिकेने धोकादायक घरात राहू नये, असे आवाहन केल्याने मोहम्मद शेख यांनी आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी हलविले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, परंतु घरातील अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तूंचे मात्र नुकसान झाले आहे.
नूर विला बंगल्याचे माळी मोहम्मद शेख (74) गेली अनेक वर्षे बंगल्याच्या गेटजवळ आपल्या मुलांसह लिंबू सरबत आणि टोपी विक्रीचा व्यवसाय करीत होते, मात्र लॉकडाऊनमुळे सव्वा वर्षापासून त्यांचा व्यवसाय बंद आहे आणि आता घरही कोसळले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. मोहम्मद शेख कुटुंबाला मुस्लीम मोहल्ला समाज अध्यक्ष नाध्यक्ष नासीर शारवान तसेच माथेरानमधील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्य शासनानेही शेख कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे.