आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. 27) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासह सध्या सुरू असलेला लॉकडाऊन आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांत लॉकडाऊनसंदर्भातील नियमावली जाहीर केली जाईल. मुख्यमंत्र्यांसोबत सर्वच मंत्र्यांचे लॉकडाऊन लगेच काढणे शक्य होणार नाही यावर एकमत झाल्याचेदेखील राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे, मात्र काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्याने सरकार सावध भूमिकेत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवला जाणार की कायम ठेवला जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अखेर मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील लॉकडाऊनसंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 1 जूननंतर महाराष्ट्रातील चित्र कसे असेल याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतरही कायम राहणार आहे, मात्र काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.