Breaking News

कुंडलिका नदीच्या किनारी रंगली शिडहोडी स्पर्धा

रोहे ः प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील खारापटी हा गाव संपूर्ण कोळी समाजाचा असून हा गाव उत्सवप्रिय आहे. या गावातील गणेश आळी मित्र मंडळाच्या वतीने कोळी समाजाचे विविध उत्सव साजरे केले जातात. यावर्षी कुंडलिका नदीच्या किनारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिडहोडीचा थरार स्पर्धेतून दिसून आला. या स्पर्धेची रंगत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळी बांधव नदी किनारी जमून त्यांनी कोळी गीतावर ठेका धरला होता. महिलांसह पुरुष वर्गाने आपला कोळी पारंपरिक वेशभूषा करीत एकच जल्लोष केला.

गणेश आळी मित्र मंडळ खारापटीच्या वतीने कुंडलिका नदीच्या किनारी शिडहोडी स्पर्धा गुढीपाडव्यानिमित्ताने कुंभोशी बंदर ते खारापटी बंदर अशी स्पर्धा घेण्यात आली. वार्‍याची साथ घेत आपली होडी आपले कलाकैशल्य दाखवित स्पर्धकांनी कुंडलिका नदीच्या किनारी थरार उडवून दिला. कुंडलिका नदी तुंडब भरलेली, तर दुसरीकडे वार्‍याची संगत त्यामुळे स्पर्धेचा आनंद औरच ठरला. नदीच्या किनारी असलेल्या कोळी बांधवांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य दाखवले. दर्याचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोळी बांधवांनी मोठ्या जल्लोषात विजेत्यांचे खालूबाजावर स्वागत केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मनोहर नरहरी पोकळे, द्वितीय क्रमांक निवास दाभाडे, तृतीय क्रमांक शशीकांत पोकळे यांनी पटकवला. त्यांना रोख रक्कम व  सन्मानचिन्ह देण्यात आले. या वेळी कोळी समाज रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंतराव पोकळे, युवा नेते नवनीत डोलकर, माजी सरपंच पंढरीनाथ पोकळे, तानाजी कारभारी, प्रदीप पोकळे, मिलनाथ नाईक, गणेश नाईक, निमेश नाईक, चंद्रकांत कारभारी, प्रकाश पोकळे, विनायक कारभारी, जयवंत रामचंद्र पोकळे, दयु पोकळे, मनोहर कारभारी, अमोल पोकळे, महेश चेारगे, नामदेव पोकळे, मच्छींद्र नाईक, संतोष नाईक, राकेश पाटील, चेतन पाटील, राजकुमार पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस सभारंभ झाल्यानंतर कुंडलिका नदीच्या किनारी कोळीगीतांवर समाज बांधवानी पारंपरिक वेशभूषा परिधान करून ठेका धरला. यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळी बांधव सहभागी झाले होते.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply