दक्षिण आफ्रिकेचा डावाने दणदणीत विजय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
वेस्ट इंडिज संघाला घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव आणि 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा हा 200वा पराभव ठरला. लुंगी एनगिडी, कागिसो राबाडा व अॅनरिच नॉर्ट्जे यांच्या भेदक मार्यासमोर विंडीजला दोन्ही डावांत तग धरता आला नाही. त्यांचा पहिला डाव 97 आणि दुसरा डाव 162 धावांत गडगडला.
दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर 322 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये 200 पराभव पत्करावा लागलेला विंडीज हा इंग्लंड (308) व ऑस्ट्रेलिया (226)नंतरचा तिसरा संघ ठरला आहे, पण इंग्लंडने 377 आणि ऑस्ट्रेलियाने 394 सामने जिंकले आहेत. याउलट विंडीजच्या खात्यात 177 विजय आहेत.
लुंगी एनगिडीने पहिल्या डावात 19 धावांत 5 विकेट्स घेतल्या, तर नॉर्ट्जेने 35 धावांत 4 आणि राबाडाने 1 विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. विंडीजचा पहिला डाव 97 धावांत गडगडला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या नाबाद 141 धावांच्या जोरावर त्रिशतकी पल्ला गाठला. डी कॉकने 170 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकारांसह ही खेळी साकारली. एडन मार्करामने 110 चेंडूंत 7 चौकारांसह 60 धावा केल्या. विंडीजकडून जेसन होल्डर (4-75), जेडन सील्स (3-75) आणि केमार रोच (2-64) यांनी चांगली गोलंदाजी केली.
विंडीजकडून दुसर्या डावात संघर्ष पाहायला मिळाला, परंतु तो फक्त रोस्टन चेसकडूनच. त्याने 156 चेंडूंत 62 धावा केल्या. अन्य सहकार्यांनी राबाडासमोर गुडघे टेकले आणि त्यांचा दुसरा डावही 162 धावांवर गडगडला. राबाडाने 34 धावांत 5 विकेट्स घेतल्या. नॉर्ट्जे व केशव महाराज यांनी अनुक्रमे तीन व दोन विकेट्स घेतल्या.