दोन दिवसांपूर्वी ओमर अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीतरी लागट बोलले आणि मला एकदम वि. स. बापटांची आठवण आली. अशा तत्त्वनिष्ठ आणि पिळदार माणसांच्या सहवासात मला विश्वासाने काही काळ काम करावयास मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोदींनी काश्मीरमध्ये एक प्रचार सभा घेतली. शेख अब्दुल्ला आणि मुफ्ती मोहम्मद सईद घराण्यांना त्यांनी साहजिकच लक्ष्य केले. ही घराणी काश्मिरात पिढ्यान्पिढ्या सत्ता भोगत असल्यामुळे त्यांना हा प्रदेश म्हणजे आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटू लागली आहे आणि भारताविषयीची त्यांची बांधिलकी कमी होऊ लागली आहे, अशी टीका मोदींनी केली. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो कोणालाही तोडू दिला जाणार नाही, अशी गर्जनाही त्यांनी केली. ते अर्थातच तिसर्या पिढीतील ओमर अब्दुल्ला यांना रुचणे शक्य नव्हते. त्यांनी मोदींवर पलटवार केला. आम्ही एवढे जर वाईट आहोत, तर आमच्याशी जवळीक का साधता, दिल्लीत आम्हाला सत्तेत सहभागी का करून घेता आणि काश्मिरात आमच्या मांडीला मांडी लावून सत्ताधीश का होता, असे प्रश्न त्यांनी धाडधाड मोदींना विचारले. मोदी आणि भाजप यांना देशाचे काही पडलेले नाही, तर तेही सत्तालोलुप आहेत आणि त्यासाठी कोणत्याही थराला ते जाऊ शकतात, असा निष्कर्ष लोकांनी काढावा, असे त्यांनी सुचविले.
वि. स. बापट हे पहिल्या प्रतीचे पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी काँग्रेसजन. त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. उगाच फुशारक्या मारल्या नाहीत, पण कधीही कुणासमोर वाकले नाहीत. ते पश्चिम महाराष्ट्रातले. नेमके कोठले ते एकेकाळी माहीत होते, पण आता विसरायला होते. तरी बहुतेक कर्हाडचे. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात जी जाळपोळ आणि लुटालूट झाली त्यात तेही खरपूस होरपळून निघाले. त्यांचे काही एकराचे शेत आणि राहता वाडा ओळखीच्या लोकांनी बळकावला आणि त्यातले काहीही त्यांना परत मिळाले नाही. त्यावेळी झालेल्या झटापटीत बापटांची दोन सख्खी माणसे ठार मारण्यात आली, पण बापट डगमगले नाहीत. शेताचे आणि वाड्याचे अधिकृत धनी तेच होते. त्यानंतर 30 वर्षे प्रतिवर्षी वारीला जावे तसे न चुकता बापट गावी जात. काही झालेच नाही असे दाखवत. त्या लुटारू माणसांचा आरपार राबता असलेल्या वाड्यावर उतरत. विहिरीवर आंघोळ करीत. ओसरीवर वरणभात शिजवत. शेतावर जाऊन जेवत. चूळ भरून वाड्यावर परतत. रात्री मुक्काम करून सकाळी मुंबईला निघत. निघण्यापूर्वी तलाठ्याला भेटून शेतसारा भरत आणि आपणच धनी आहोत हे शांतपणे घोषित करत. त्यांनी आपला हक्क शेवटपर्यंत सोडला नाही.
बापट अशीतशी आसामी नव्हती. मोहन धारिया, नरेंद्र तिडके यांच्या समवेत त्यांनी कारावास भोगला होता आणि त्यांचे संबंध अरेतुरेतले होते. नेहरूंची एक सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती, इतके संघटनेत ते ज्येष्ठ होते, परंतु का कुणास ठाऊक त्यांनी ओळखीला हाक मारली नाही. हा वाडा, हे शेत माझे आहे. मला एकट्याला ते हिसकावून घेता येत नाही, पण ते माझेच आहे आणि दुसर्या कोणाचेही नाही हे कंठशोष करून जगाला सांगण्याचा माझा हक्क मी कधीही सोडणार नाही, हा त्यांचा निर्धार अखंड होता. तुम्हाला दगाफटका होईल अशी भीती वाटली नाही का, असे मी विचारले तेव्हा ते म्हणाले की, तिसरा खून पडेल ही शक्यता मी गृहीत धरली होती. मुंबईहून निघताना मी शेवटचा निरोप घेऊनच निघत असे, पण वाड्यावर पाठ टेकताच मला शांत झोप लागे. एकदाही झोप चाळवली नाही. त्यांची स्थितप्रज्ञता आणि धैर्य अफाट होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या झंझावातात जन्मभूमी ट्रस्टने आकसाने एकाएकी बंद पाडलेल्या ‘लोकमान्य’ दैनिकाचे बापट शेवटचे संपादक. तो विश्वासघात त्यांना सहन झाला नाही म्हणून त्यानंतर त्यांनी कोणाकडेही नोकरी केली नाही. मुक्त पत्रकार म्हणून ताठ मानेने ते सुखवस्तूपणाने जगले. मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या चार भाषांत ते सराईतपणे राजकारणावर, कामगार आणि सहकार विषयावर लिहीत. त्यांचे ‘श्रमिकांची वाटचाल’ हे मासिक होते. तेथे मी त्यांना सहकार्य करी आणि माझ्या इंडिया न्यूज अॅण्ड फिचर अलायन्समध्ये ते नियमित स्तंभलेखन करीत. ग. वि. केतकर, दुर्गादास, एस. ए. अय्यर, दादासाहेब आपटे, बापूराव भिशीकर अशा नामवंत संपादकांच्या हाताखाली मी काम केले, पण बापट सामान्यातले असामान्य होते. ते आपल्या मासिकात एकही अक्षर फुकट छापत नसत आणि लेख स्वीकारला की लगेच मानधन देत. कामगारांनी प्रयत्नवादी असावे म्हणून लॉटरीच्या जाहिराती त्यांनी कधी छापल्या नाहीत. त्यांच्यात बरेच काही दुर्मीळ होते. मी
’विवेक’चा संपादक असताना त्यांचे निधन झाले आणि मी त्यांच्यावर मृत्युलेख लिहिला आहे.
बापटांच्या आठवणींच्या पार्श्वभूमीवर मी मोदींकडे पाहतो. काश्मीर अनादी काळापासून आमचा आहे. तो नेहरूंनी अब्दुल्ला घराण्याला आंदण दिला म्हणून मुसलमानांचा होत नाही. काश्मीरवाचून पाकिस्तानच्या फाळणीचे हिशेब पूर्ण होत नाहीत. काश्मीर स्वतंत्र व्हावे म्हणून अमेरिकेत धनाढ्य मुसलमानांची मोठी लॉबी प्रयत्नशील आहे. भारत सरकारवर दबाव टाकण्यास अमेरिकेतल्या सरकारला प्रवृत्त करावे इतकी ही लॉबी वजनदार आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो कोणालाही तोडू देणार नाही, असे पूर्वीचे आणि आजचे पंतप्रधान म्हणतात, त्यात पुष्कळ अंतर आहे. काश्मीरसाठी आणि काश्मीर तोडू पाहणार्यांचे मोदी काहीही करू शकतात. परिस्थितीचा आवाका प्रचंड असूनही दुबळे बनण्यास नकार देणार्या आणि शेवटपर्यंत एकाकी झुंज देत राहणार्या माणसांचा महाराष्ट्र बनला आहे हे शरद पवारांच्या लक्षात आले असते, तर प्रत्येकाला विकत घेण्याचा खेळ ते खेळले नसते. सामाजिक समरसतेच्या दृष्टीने आणि सामूहिक प्रयत्नांनी विकासकामात महाराष्ट्र कोठच्या कोठे गेला असता, तसेच मोदी हा योध्दा आहे, गनिमी काव्यात विशारद आहे आणि कधीही हार न मानणारा आहे हे काश्मीरमधील आतंकवादी आणि त्यांना साथ देणारे राजकारणी जेवढ्या लवकर ओळखतील, तेवढे त्यांच्या हिताचे आहे. मोदी सत्तालोलुप नाहीत. ते अखंड भारतवादी आहेत आणि त्यांच्या आड जे येतील, त्यांचे हृदय परिवर्तन कशाने करायचे ते त्यांना पक्के माहीत आहे.
-अरविंद विठ्ठल कुलकर्णी