Breaking News

‘मविआ’तील सुंदोपसुंदी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे बिनपैशांचा तमाशा आहे. या सरकारच्या स्थापनेला एक वर्ष होऊन गेले, मात्र यांच्यातील कुरबुरी काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. उलट त्या वाढत चालल्या असल्याचे दिसून येते. आता तर यांची मजल एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. राज्यात गत विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन होत होते तेव्हा सर्वप्रथम शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र आले होते. काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी अशा प्रकारच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवातीला अनुकूल नव्हत्या, पण केंद्रासह अनेक राज्यांतील सत्ता गेली असल्याने शेवटी काँग्रेस नेतृत्व महाराष्ट्रात सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार झाले आणि किमान समान कार्यक्रम ठरवून सरकार स्थापन झाले. या सरकारला एक वर्ष उलटल्यानंतर कुरबुरी वाढू लागल्या आहेत. विशेषत: काँग्रेस पक्ष नाराज आहे. खरेतर पहिल्यापासूनच आपल्याला डावलले जात असल्याची भावना काँग्रेसमध्ये आहे. त्याचा प्रत्यय याआधी वारंवार आलेला आहे. या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंतही तक्रारी गेल्या होत्या. आता तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. विशेषकरून नवी जोडगोळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्याच सरकारला एक प्रकारे ललकारले आहे. यामागचे कारण म्हणजे शिवसेना-राष्ट्रवादी जवळीक. अगदी हे दोन पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढविणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच काँग्रेसला बाजूला सारले जाऊ शकते. हाच धोका ओळखून आधीच असंतुष्ट असणार्‍या काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.  त्यातूनच आधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यापाठोपाठ राहुल गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीदेखील एकटे लढूद्या, मग बघूयात किस में कितना है दम, असे म्हणत थेट मित्रपक्षांना आव्हानच दिले. यावरून शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर जळजळीत टीका केली. लोक तुम्हाला जोड्याने मारतील, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी योग्य वेळी उत्तर देऊ, असे सूचक विधान केले. म्हणजेच हा संघर्ष येत्या काळातही चालूच राहणार असेच दिसते. अशातच शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना-भाजप युतीचा सूर आळविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते शिवसेना कार्यकर्ते फोडत आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे लगेच होतात, पण आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या आमदारांची होत नाहीत, अशी तक्रारदेखील सरनाईक यांनी केली आहे. आमदार सरनाईक यांच्या विधानामुळे आघाडीमध्ये खळबळ माजली आहे. आता यावर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply