कर्जत ः बातमीदार
डिकसळ गावातून भिवपुरी रोडकडे जाणारा उमरोली ग्रामपंचायतीने बांधलेला सिमेंटचा रस्ता खराब झाला होता. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, तेथील व्यावसायिकांनी दगड, खडी टाकून रस्ता सुस्थितीत केल्याबद्दल भिवपुरी रोड रेल्वेस्टेशन प्रवासी संघाने त्यांचे आभार मानले आहेत. मध्य रेल्वेच्या कर्जत एण्डकडे असलेल्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात डिकसळ गावातून येण्यासाठी रस्ता आहे. तो रस्ता उमरोली ग्रामपंचायतीने तीन वर्षांपूर्वी रेल्वेची परवानगी घेऊन केला होता. रस्त्यावरून गतवर्षी पावसाचे पाणी वाहून गेले होते. त्यामुळे रस्ता खराब झाला होता. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांना वाहतूक करणे तसेच प्रवाशांना चालणेही कठीण झाले होते. याबाबत भिवपुरी रोड रेल्वेस्थानक प्रवासी संघटनेने खड्डेमय रस्त्यासाठी श्रमदान करून रस्ता सुस्थितीत करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तेथील व्यावसायिक शैलेश पटेल यांनी प्रवासी संघटनेची धावपळ पाहून दोन ट्रक दगड आणि खडीची व्यवस्था करून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली. रस्त्यासाठी दगड, खडीची व्यवस्था करून देणारे शैलेश पटेल यांचे भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष किशोर गायकवाड, सचिव गणेश मते यांनी आभार मानले आहेत.