नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडको महामंडळाने नवी मुंबईतील नेरूळ येथील वंडर्स पार्क उद्यानाच्या भूखंडाची पोटविभागणी (सबडिव्हिजन) करून, विभाजित केलेला भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेला सायन्स पार्क विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने सेक्टर-19ए, नेरूळ येथील भूखंड क्र. 50 हा नवी मुंबई महानगरपालिकेला चिल्ड्रन्स थिम पार्क विकसित करण्याकरिता भाडेकराराने दिलेला होता. त्यानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेने या भूखंडावर वंडर्स पार्क उद्यान विकसित केले आहे. त्यानंतर, नवी मुंबई महानगरपालिकेने वंडर्स पार्कमधील 3.4 हेक्टर क्षेत्रावर सायन्स पार्क उभारण्याची परवानगी देण्याची विनंती सिडकोकडे केली. यानुसार सिडकोकडून काही अटींवर, 2.00 हेक्टर क्षेत्रावर सायन्स पार्क उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. सायन्स पार्क विकसित करण्याकरिता हा भूखंड क्र. 50ची भूखंड क्र. 50 व 50ए अशी पोटविभागणी करण्यात येणार आहे. वापर बदल करून 50ए हा 2.00 हेक्टरचा भूखंड नवी मुंबई महानगपालिकेस सायन्स पार्क विकसित करण्याकरिता हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या भूखंडाकरिता अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक 1.00 असणार आहे. सायन्स पार्कमुळे सांस्कृतिक प्रगतीबरोबरच विज्ञानविषयक दृष्टीकोन व जाणीव विकसित होण्यास मदत होईल, असे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.