Breaking News

एटीएममध्ये स्कीमर, छुपा कॅमेरा

पनवेल : बातमीदार  – एटीएमद्वारे रोख रक्कम काढण्यासाठी येणार्‍या नागरिकांची माहिती चोरण्याच्या उद्देशाने दोघा नायजेरियन नागरिकांनी तळोजा पाचनंद येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या एटीएममध्ये कार्ड रिडरवर स्कीमर डिवाइस व एटीएम कीबोर्डच्या वरील बाजूस कॅमेरा डिवाइस लावल्याचे उघडकीस आले आहे. या एटीएम सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीवरून हा प्रकार उघडकीस आला असून तळोजा पोलिसांनी दोघा नायजेरियन नगारिकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

28 जून रोजी तळोजा पाचनंद येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यासाठी आलेल्या टेक्निशियनला या एटीएममध्ये स्कीमर आणि छुपा कॅमेरा लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती बँकेच्या व्यवस्थापकांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ हे एटीएम बंद करून एटीएम सेंटरला कुलूप लावले. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या दिवशी बँकेच्या आयटी विभागाच्या माध्यमातून एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तपासणी केली असता, 27 जून रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास एटीएममध्ये आलेल्या दोघा नायजेरियन नागरिकांनी एटीएममध्ये स्कीमर आणि कॅमेरा लावल्याचे आढळून आले. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक प्रशांत वाघमारे यांनी तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा नायजेरियन नागरिकांविरोधात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

धोका टाळण्यासाठी…  एटीएमद्वारे रोख रक्कम काढणार्‍या ग्राहकांच्या बँक खात्यातील रोख रक्कम परस्पर काढता यावी, यासाठी चोरांकडून एटीएमच्या कार्ड रीडरवर स्कीमर व एटीएम कीबोर्डच्या वरच्या बाजूस कॅमेरा लावला जातो. त्यानंतर चोरांकडून या दोन्ही डिवाइसच्या माध्यमातून एटीएमधारकांच्या एटीएमचे पासवर्ड व त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळवून त्यांच्या बँक खात्यातील रोख रक्कम परस्पर काढली जाते. त्यामुळे एटीएममध्ये रोख रक्कम काढण्यासाठी जाणार्‍या नागरिकांनी एटीएममध्ये स्कीमर अथवा छुपा कॅमेरा लावण्यात आला नसल्याची खात्री करावी, त्यानंतरच त्या एटीएममधून व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply