नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
आंदोलकांनी राज्य सरकारला एकजुटीची ताकद दाखवली, परंतु राज्य सरकारने हे लक्षात घ्यावे की ही फक्त नांदी आहे, मात्र दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले नाही तर याचे रूपांतर निश्चितच वणव्यात होईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनादरम्यान ते बोलत होते. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी सिडको भवनला घेराव आंदोलन करण्यात आले, मात्र या वेळी पोलिसांनी सर्व रस्ते बंद करून काही जणांना अडविलेे. सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर हेही आंदोलनला जात असताना त्यांना व त्यांच्या सहकार्यांना कळंबोली येथे पोलिसांनी अडविले. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले की, याचा अर्थ स्पष्ट होतो की, राज्य सरकार आम्हाला घाबरते. म्हणूनच आज पोलिसांच्या माध्यमातून सिडकोकडे जाणारे सर्व मार्ग रोखून धरले. शेकडो भूमिपुत्रांना चालतसुद्धा आंदोलनस्थळी जाऊ दिले नाही. तरीही निश्चयाला भिडलेल्या हजारो भूमिपुत्रांनी आंदोलनस्थळ गाठले आणि राज्य सरकारला एकजुटीची ताकद दाखवली, परंतु सरकारने हे लक्षात घ्यावे की, ही फक्त नांदी आहे. ‘दिबां’चे नाव विमानतळाला दिले नाही तर ह्या नांदीचे रूपांतर निश्चितच वणव्यात होईल.