जम्मू-काश्मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट केला. भारताशी थेट युद्ध परवडणारे नाही हे पाकिस्तानी नेतृत्वाला चांगलेच ठाऊक आहे. कारण गेल्या तीन युद्धांमध्ये भारतीय सैन्याकडून पाकिस्तानने चांगला प्रसाद चाखला आहे. मथितार्थ एवढाच की भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये चौथे युद्ध पेटण्याची शक्यता आता धुसर होत चालली आहे. असे असले तरी सध्याचा जमाना छुप्या युद्धाचा आहे हे अलीकडच्या ड्रोन हल्ल्यांवरून स्पष्ट होते.
जग जसजसे पुढे जाऊ लागले तसतशी युद्धाची रूपे देखील बदलू लागली. रणांगणावर खंदक खणून गोळीबार करणारे सैनिक, रणगाड्यांचे हल्ले, तुंबळ धुमश्चक्री हे युद्धाचे जुने स्वरुप होते. ते आता क्वचितच बघायला मिळते. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साथीने मानवी समुदायाने आपला विकास साधून घेतला. थेट मंगळ ग्रहापर्यंत विज्ञानाची शिडी पोहोचली. परंतु त्याच मानवी समुदायातील एक काळी बाजू अधिकच प्रखरपणे पुढे आली हेही तितकेच खरे. ही प्रखर बाजू म्हणजे दहशतवाद. दुर्दैवाने भारताच्या नशिबी चांगला शेजार नाही. चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश भारताला मित्र मानत नाहीत. किंबहुना, या दोन्ही देशांची गणना शत्रूपक्षातच होते. या दोन्ही शेजारी राष्ट्रांनी भारतीय सैन्याला गेली अनेक दशके बराच त्रास दिला आहे. लडाखमध्ये चिनी सैन्याने मोठी आगळीक केली. त्या घटनेनंतर फार काळ उलटलेला नाही. त्याचे प्रत्यंतर गेल्या दोन दिवसांत भारताला आले आहे. काश्मीरमधील रातनु चाक-कालु चाक या लष्करी भागात सोमवारी दोन ड्रोन दिसले. भारतीय लष्कराच्या जवानांनी सतर्कता दाखवत गोळीबार करून हे दोन्ही ड्रोन दूर पिटाळले. आदल्या दिवशी रविवारी अज्ञात दहशतवाद्यांनी जम्मूच्या हवाई दल तळावर ड्रोनच्या मदतीने स्फोटके टाकून हल्ला केला होता. सुदैवाने या दोन्ही हल्ल्यांत काहीही नुकसान झाले नाही. ड्रोन म्हणजे छोटी स्वयंचलित विमानेच असतात. त्यात अर्थातच वैमानिक नसतो व ती रिमोट कंट्रोलद्वारे उडवली जातात. चित्रपटांच्या चित्रिकरणामध्ये ड्रोनचा वापर सर्रास होतो हे आपण पाहिले आहे. परंतु चालकविरहित ड्रोन्सवर स्फोटके लादून त्याद्वारे हिंसाचार घडवण्याचा दहशतवाद्यांचा हा प्रयत्न छुप्या युद्धाचाच भाग म्हटला पाहिजे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू- काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना राजधानी दिल्लीत पाचारण करून नव्या सुसंवादाला प्रारंभ केला होता. खुल्या मनाने पार पडलेली ही चर्चा काश्मीर खोर्याला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने उपकारक ठरेल यात शंका नाही. काश्मिरी नेत्यांनी देखील पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पाकिस्तानच्या पोटात दुखू लागले आहे. चुकीच्या मार्गाला लागलेल्या काश्मिरी युवकांना फितवून पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था दहशतवादी कारवाया करत असते हे सर्वांनाच ठाऊक आहे. कुठल्याही परिस्थितीत काश्मीर खोर्यामध्ये लोकजीवन सुरळीत होऊ नये, शांतता प्रस्थापित होऊ नये यासाठी पाकिस्तानी लष्कराचा प्रयत्न असतो. लडाखमधील चिनी कारवाया असोत किंवा पाकिस्तानच्या आशीर्वादाने झालेले ड्रोन हल्ले असोत. असल्या छुप्या युद्धाला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर नेहमीच सज्ज असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे वाटचाल करणारा भारत आता पूर्वीसारखा उरलेला नाही हे शत्रूराष्ट्रांनी लक्षात ठेवावे.