Breaking News

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप दुबईतच

आयसीसीकडून शिक्कामोर्तब

दुबई ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरुषांची आयसीसी ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये होणार असण्यावर मंगळवारी (29 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शिक्कामोर्तब केले. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असून याचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) असणार असल्याची माहिती आयसीसीने दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी 20 वर्ल्डकप भारताबाहेर होणार हे आधीच बोलले जात होते. दुबईत ही स्पर्धा हलवली जाऊ शकते अशीही चर्चा होती, ती खरी ठरली. आयपीएल स्पर्धा संपताच टी-20 वर्ल्डकप सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.  
आयपीएलचे दुसर्‍या टप्प्यातील सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान युएईमध्ये होणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसानंतर 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कप आयोजित केला जाईल, असा अंदाज आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकांसंबंधीचा अंतिम निर्णय आयसीसीकडून घेतला जाईल. अहवालानुसार अबूधाबी, शारजाह आणि दुबईमध्ये हे सामने रंगतील. गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलियामधील प्रस्तावित टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलला होता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात नुकत्याच झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाची नजर टी-20 वर्ल्डकप जिंकण्यावर असेल. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसीचे मोठे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ करेल.
एकूण 45 सामने रंगणार
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 संघांना संधी देण्यात आली असून एकूण 45 सामने होणार आहेत. पहिली फेरी आठ संघांमध्ये असेल. दोन गटांत चार-चार संघ असतील. एकूण 12 सामने होणार आहेत. दोन्ही गटांतील अव्वल संघ ‘सुपर-12’साठी पात्र ठरतील. येथे 12 संघ दोन गटांत विभागले जातील व एकूण 30 सामने होणार आहेत. यानंतर उपांत्य फेरीचे दोन सामने आणि सरतेशेवटी अंतिम सामना होईल.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply