महापालिका आयुक्तांचे कठोर कारवाईचे आदेश
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्येही मोठी गर्दी होते. या ठिकाणी मास्कचा वापर होताना दिसत नाही. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगही पाहायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत नवी मुबंई परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दिवाळी ते 31 जानेवारीदरम्यान होणारी कोरोना रुग्णांची संथ्या कमी होऊ लागली होती. दिघा, इंदिरानगर आणि चिचंपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. पण 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरु झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याचं बोललं जात आहे. एक महिन्यापूर्वी दररोज 40 ते 60 रुग्ण आढळून येत होते. आता मात्र ही संख्या 80 ते 100वर जाऊन पोहचली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी 109 रुग्ण आढळून आले आहेत.
बेलापूर, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच बाजारपेठांमध्ये कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मास्कचा वापर होत नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही सर्वांना विसर पडला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आता अधिक कठोर भूमिका घेण्याचे ठरवले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश बांगर यांनी दिले आहेत.
फेब्रुवारीत रुग्णसंख्या वाढ अधिक
फेब्रुवारी महिन्यातील 20 दिवसांत नवी मुंबई परिसरात दोन हजार 110 रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 805 वरुन एक हजार 40 वर पोहचली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमांमध्ये आणलेली शिथिलता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्याने नागरिकांमध्ये वाढलेली बेशिस्त यामुळे कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.
बाजारापेठांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा विसर
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच बाजारपेठांमध्ये नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. मास्कचा वापर केला जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही नागरिकांना विसर पडला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही रुग्णवाढीची गंभीर दखल घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.