पाली : प्रतिनिधी
आदिवासींच्या जमिनी खरेदी व विक्री व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार सुधागड तालुक्यात गेल्या पाच वर्षात झालेल्या आदिवासींच्या जमिनीच्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. सुधागड तालुक्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी आहेत. मात्र या जमिनी बिगर आदिवासींना कवडीमोल किंमतीला विकल्या जात आहेत. हे हस्तांतरण रोखण्यासाठी माहिती आधिकार कार्यकर्ते विजयकुमार श्रीरंग यादव यांनी मुख्यमंत्री, महसुलमंत्री व संबंधीत अधिकार्यांकडे तक्रार व चौकशीची मागणी केली होती. सुधागड तालुकास्तरावर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आदिवासी जमीन खरेदी विक्री दस्त नोंदणी झाली आहे, त्याची मागील पाच वर्षातील दस्तनोंदणीची सखोल तपासणी व चौकशी करण्याचे आदेश महसूल विभागाने रायगडच्या सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार शासन नियम व प्रचलित धोरणानुसार उचित कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 यांना दिले आहेत. त्यामुळे आता सुधागड तालुक्यातील आदिवासीच्या जमिनी खरेदी व विक्री व्यवहारांची चौकशी होणार आहे. जमीन व्यवहारात आमच्या अदिवासी बांधवांची फसवणूक झाली आहे, या चौकशीतून त्यांना न्याय मिळावा, अशी भावना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण संघटक रमेश पवार यांनी व्यक्त केली आहे.
आदिवासींच्या जमीन व्यवहारामध्ये पूर्णपणे पारदर्शकता पाळली जाते. कोणीही आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊ नये. कोणी अन्याय करत असेल तर ताबडतोब आम्हाला कळवावे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड