Breaking News

ओएनजीसी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावणार; आमदार महेश बालदी यांचे आश्वासन

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

कोटगाव प्रकल्पग्रस्त ओएनजीसीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असून त्या संबंधित पत्र ओएनजीसी प्रशासनाला देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी जमिनी गेल्या, परंतु अद्याप प्रकल्पबाधितांना रोजगार दिले नसल्याने त्यांनी आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी त्यांनी कोटगाव प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था ओएनजीसीविरोधात आंदोलन करणार अशा आशयाचे पत्र ओएनजीसी व्यवस्थापनास दिले आहे. त्याचप्रमाणे आमदार महेश बालदी, रायगड जिल्हाधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग), ओएनजीसी उरण प्लान्टचे व्यवस्थापकीय संचालक, उरण तहसीलदार, उरण पोलीस ठाणे आदींना पत्र देण्यात आले आहे. दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, उरण ओएनजीसी प्रकल्पाकरिता गेल्या 40 वर्षांपूर्वी शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित करण्यात आल्या असून या संपादित जमिनीवर स्टोर हाऊस गोदामे, ओएनजीसी कॉलनी, सीआयएसएफ कॉलनी, रस्ते, पाइपलाइन अशा विविध स्वरूपाचे प्रकल्प तयार करण्यात आले, परंतु अजतागायत प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पामध्ये कोणत्याही स्वरूपात रोजगार किंवा कायमस्वरुपात नोकरी मिळालेली नाही. मागील 2013 ते 2015 या कालावधीत आमच्या प्रकल्पग्रस्त संस्थेमार्फत चारफाटा उरण येथे आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी कंपनीच्या कार्यालयीन आस्थापनासोबत पाच ते सहा बैठकीत चर्चा करण्यात आल्या व त्या बैठकीत असे आश्वासन देण्यात आले की, पुढील येणार्‍या कायम स्वरूपी भरतीमध्ये आपल्या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा विचार केला जाईल. तसेच याबाबत वारंवार पत्राद्वारे आणि निवेदनाद्वारे पाठपुरावा चालु आहे, परंतु कंपनी प्रशासन प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना केराची टोपली दाखवित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. ओएनजीसी कंपनीने कोणत्याही प्रकल्पग्रस्ताला नोकरीत सामावून घेतले नाही. उलट ऑनलाइनप्रकारे भरतीचा बहाणा करून कंपनी चालढकलपणा करीत आहे. ह्या प्रकरणाची शहानिशा करून प्रकल्पग्रस्त शेतकरी व कंपनी आस्थापनासोबत येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये बैठक घडवून आणावी. अन्यथा कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्याशिवाय प्रकल्पग्रस्तांपुढे कोणताही पर्याय उरणार नाही. याची दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या वेळी आमदार महेश बालदी यांनी ओएनजीसी प्रशासन व तहसीलदारांसोबत बैठक होईल तेव्हा मी स्वत: हजर राहीन व हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावेल, असे प्रकल्पग्रस्तांना आश्वासन दिले. निवेदन देताना कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्थेचे अध्यक्ष नवनित भोईर, सहसचिव हेमदास गोवारी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, खजिनदार सुरज पाटील, महेश भोईर, नित्यानंद भोईर, भाजप उरण तालुका ओबीसी सेल अध्यक्ष हेमंत भोंबळे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply