Breaking News

नव्या निर्बंधांमुळे व्यापार्‍यांमध्ये नाराजी; नवी मुंबईत मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे पुन्हा बंद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील सर्व जिल्हे तिसर्‍या टप्प्यात घेतले गेल्याने नवी मुंबई शहरात सोमवारपासून 28 जून ते 5 जुलैपर्यंत कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून व्यापारी वर्गामध्ये मात्र मोठी नाराजी पसरली आहे. दुकानांच्या वेळाही बदलण्यात आल्या असून आता दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहे. सातत्याने होणार्‍या निर्बंधामुळे याचा परिणाम व्यापारावर होत असल्याचे नाराजी दुकानदारांनी व्यक्त केली. दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार शहरातील बहुतांश व्यवहार 4 जूनपासून सुरू करण्यात आले होते. नवी मुंबई शहर दुसर्‍या टप्प्यात असल्याने शहरातील बहुतांश निर्बंध हटवण्यात आले होते, परंतु कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून डेल्टा प्लसच्या संभाव्य धोक्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळपासूनच शहरातील मॉल, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद ठेवण्यात आली होती. एकीकडे शहरात कडक नियम लागू झाले असताना दुसरीकडे शहरातील व्यापारी वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सातत्याने होणार्‍या बंदमुळे व्यापारावर मोठा परिणाम होऊन मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले. त्यामुळे दुकान सकाळी उघडले तरी नागरिक खरेदीसाठी 11 नंतर येतात, असे काही दुकानदारांनी सांगितले. शहरातील दुकानांबरोबरच मॉलमधील दुकानचालकांची आर्थिक घडी पूर्णत: बिघडली असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर मॉलमधील आस्थापनांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. 5 जुलैच्या सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याने शहरात सायंकाळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद झाल्याचे पाहायला मिळाले.

सततच्या टाळेबंदी व निर्बधांमुळे मॉलमधील व्यापारावरही परिणाम झाला आहे. रघुलीला मॉलमध्ये 200 छोटी आणि आठ मोठी दुकाने आहेत. त्यातील काही दुकानेच आता सुरू झाली होती. ती पुन्हा बंद त्यामुळे दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे.

-संदीप देशमुख, रघुलीला मॉल व्यवस्थापन

शहरात नियमावलीनुसार निर्बंध लागू झाले आहेत. अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आहे. नागरिकांनी नियमावली पाळून पालिकेला सहकार्य करावे.

-संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply