सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांना रौद्ररूप
महाड : प्रतिनिधी
तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून, या पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे शहरातील बैठ्या घरांचे आणि लगतच्या शेतीचे, वाहनाचे आणि व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सर्वच रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे शहरासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. धोक्याची पातळी ओलांडलेल्या या नद्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास महाड शहरात प्रवेश केला. शहरातील मुख्य बाजारपेठ, गांधारी नाका, शेंडाव नाका, रोहिदास नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काकरतळे, नवेनगर, कुंभारआळी आदी परिसरात पुराचे पाणी घुसल्याने बैठ्या घरांना आणि दुकानदारांना पुराचा फटका बसला आहे. या पुरामुळे महाड – रायगड मार्गावरील लाडवली पुल आणि दादली पुलावरून पाणी गेल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महाड औद्योगिक क्षेत्रातदेखील काळ नदीचे पाणी शिरल्याने या परिसरातील अंतर्गत मार्ग बंद झाले. शिवाय कंपन्यांनादेखील या पुराच्या पाण्याचा फटका बसला. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावाकडे जाणार्या चित्तदरवाजा ते निजामपूर या मार्गावर तीन ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे हा मार्गदेखील ठप्प झाला. तसेच भोरघाटात दरड कोसळल्याने पुणे – भोर – महाड मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुराचे पाणी बघणे पडले महागात
टेरेस वरून पडून इसमाचा मृत्यू
महाडमध्ये प्रतिवर्षी पुराचे पाणी येते. दादली पूल, गांधारी आदी ठिकाणी हे पाणी बघण्यासाठी लोकांची गर्दी असते. असाच पूर बघण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेलेल्या संजय नरखेडे (वय 50) यांचा पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाला. महाड शहरातील अप्सरा हॉटेलसमोर असलेल्या एका इमारतीत ही दुर्घटना घडली.
दरम्यान, महाड तालुक्यातील दासगावमध्ये असिफ बागवान यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील सहा ते सातजण अडकून पडले होते. त्यांना एका रेस्क्यू पथकाने बाहेर काढले.