Breaking News

नवरात्रोत्सव विशेष : वेणगाव येथील जागृत महालक्ष्मी

कर्जत : विजय मांडे
कर्जत रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर कर्जत-जांभिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मीचे स्वयंभू देवस्थान आहे. हे देवस्थान प्राचीन व जागृत असून पंचक्रोशीसह इतर ठिकाणांहून असंख्य भाविक नवरात्रोत्सवात आवर्जून दर्शनासाठी येतात.
या देवास्थानची आख्यायिका अशी सांगितली जाते की, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीस भेटावयास जाताना तिच्या रथाचे चाक घसरले व थोड्याच अंतरावर रथाच्या एका घोड्याचा पाय घसरला. श्री महालक्ष्मी तेथेच वास करून राहिली ते ठिकाण म्हणजेच सद्यस्थितीतील असलेले श्री महालक्ष्मी मंदिर होय. देवीच्या रथाचे चाक व घोड्याचा पाय जेथे घसरला ती ठिकाणे मंदिर परिसरात आजही पहावयास मिळतात.
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी वेणगाव येथील एक गावकर्‍याच्या स्वप्नात देवीने येऊन येथे वास करीत असल्याचा दृष्टांत दिला. त्यानुसार गावकर्‍यांनी तिथे निवारा बांधला. देवीची दैनंदिन पूजा-अर्चा सुरू केली व ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. काळाच्या ओघात मंदिर जीर्ण झाले होते तसेच भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी या श्रद्धास्थानाचा जीर्णोद्दार 1997 साली विश्वस्त समितीने केला. या देवीचे स्थान स्वयंभू असून तिच्या नवसाची प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे. त्यामुळे पंचक्रोशी तसेच लांबून भक्तगण महालक्ष्मीच्या दर्शनास येत असतात.
देवीचे मंदिर अतिशय रम्य अशा ठिकाणी आहे. आजूबाजूला डोंगर, शेती, वनश्री असल्याने या परिसरात आल्यावर खूपच प्रसन्न वाटते.

वेणगाव येथील श्री महालक्ष्मी देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे नवरात्रोत्सव साजरा करण्यात अडचण होती. भक्तांना कोरोनाचे नियम पाळून दर्शन देण्यात येत होते. यंदा दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. अगदी दररोज चार-पाच किमी अनवाणी पायांनी येणार्‍यांची संख्यासुद्धा मोठी आहे.
-रंजन दातार, अध्यक्ष, श्री महालक्ष्मी देवस्थान, वेणगाव

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply