टोकियो ः वृत्तसंस्था
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या अर्जेंटिनाला साखळी फेरीतील सामन्यात धूळ चारली आहे. भारताने अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 3-1च्या फरकाने जिंकला. या विजयासोबतच भारताने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ गोलशून्यच्या बरोबरीत होते. पहिल्या 30 मिनिटांमध्ये एकाही संघाला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली नाही. सामन्याच्या 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरच वरुण कुमारने भारताकडून पहिला गोल करीत सामन्यात भारतीय संंघाला 1-0ची आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने चौथ्या क्वार्टरमध्ये सामन्यामध्ये आपला पहिला गोल केला. 48व्या मिनिटाला मॅको स्कूथने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत सामना 1-1च्या बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघ अगदीच आक्रमक पद्धतीने खेळ करताना दिसले. भारताकडून 58व्या मिनिटाला विवेक सागरने गोल करीत भारताला 2-1ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या 59व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताची आघाडी 3-1वर नेली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताला या सामन्यात एकूण आठ कॉर्नर मिळाले. त्यापैकी दोनमध्ये भारताला गोल करण्यात यश आले.