भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकाविले
टोकियो ः वृत्तसंस्था
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचत सुवर्णपदक पटकाविले. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
भारताने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेच्याभालाफेक प्रकारात पदक जिंकले आहे. 23 वर्षीय नीरजने पहिली फेक 87.03 मीटर, दुसरी 87.58 मीटर, तिसरी 76.79 मीटर लांब केली. त्याची चौथी व पाचवी फेक फाऊल गेली, पण पहिल्या तीन फेकींमधील उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय लष्करात नायब सुभेदार असणार्या नीरजने भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. अॅथलेटिक्समध्ये यापूर्वी कोणत्याही भारतीयाने ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही. भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी 1900च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्सची दोन पदके जिंकली होती, परंतु ते इंग्रज होते. दरम्यान, सर्व स्तरांतून नीरजचे अभिनंदन होत आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतआज इतिहास घडविला गेला आहे. नीरज चोप्राने जे यश प्राप्त केले ते सदैव स्मरणात राहील. तो प्रचंड जिद्दीने खेळला व जिंकला. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन!
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान